Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले Muktatai Tilak
) December 22, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

       नागपूर, दि. 22 : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलिकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करून सुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला मुकलो : सुधीर मुनगंटीवार

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे एका निष्ठावान कार्यकर्तीला आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुक्ता टिळक गेले काही महिने गंभीर आजाराशी झुंजत होत्या. त्याही परिस्थितीत त्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसाठी स्ट्रेचरवरून उपस्थित राहिल्या होत्या, असे सांगून श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की मुक्ताताईंनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील सून म्हणून वावरतांना जनसेवेचा आणि जनजागरणाचा लोकमान्यांचा वसा त्यांनी पुढे चालविला. भाजपाचे काम करतांना त्यांचे सेवाव्रती व्यक्तिमत्व बहरून आले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी आपला ठसा जसा उमटवला तसेच कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार म्हणून मिळालेल्या अल्पकाळातही त्यांनी आपले नाव जनमानसात कोरले. कोरोना काळात आणि त्यापूर्वी त्यांनी केलेली जनसेवा पुणेकर आणि भाजपा कार्यकर्ते विसरणार नाहीत.

आम्ही टिळक कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मुक्ताताईंना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवार व कार्यकर्त्यांना या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.