झाडीपट्टी नाट्य संमेलनाकरिता ब्रम्हपुरी शहर सज्ज - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, सप्टेंबर १३, २०२२

झाडीपट्टी नाट्य संमेलनाकरिता ब्रम्हपुरी शहर सज्ज

१७ व १८ सप्टेंबर रोजी आयोजन : दिग्गजांच्या उपस्थितीत संमेलन पार पडणार
नागपूर : चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी इथे पार पडणार आहे. या संमेलनाची तयारी ही पूर्ण झाली असून यजमानपद मिळालेली ब्रम्हपुरी नगरी ही सज्ज झाली असून कलावंत व रसिकांसह ब्रम्हपुरीकरांना संमेलनाची उत्सुकता आहे. या निमित्याने दिग्गजांची उपस्थिती शहरात लाभणार आहे.

         विद्या नगरी म्हणून ऐतिहासिक वारसा असलेल्या ब्रह्मपूरी शहरात पहिल्यांदाच झाडीपट्टी नाट्य संमेलन पार पडत आहे. पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या विस्तीर्ण प्रांगणात हे ४ थे झाडीपट्टी नाटय संमेलन पार पडणार आहे. सुप्रसिद्ध गायक, अभिनेते अनिरुद्ध वनकर यांच्या अध्यक्षतेखाली हे दोन दिवसीय संमेलन येत्या १७ ते १८ सप्टेंबर चालणार आहे, तर संमेलनाचे  स्वागताध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार राहणार आहेत.  उदघाटन १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे माजी निदेशक पद्मश्री प्रा. वामन केंन्द्रे यांच्या हस्ते होणार आहे. मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, एसडीओ संदीप भस्मे, एसडीपीओ मिलिंद शिंदें, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, पुण्यनगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, ब्रह्मपूरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक रामटेके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष डॉ. नरेश गडेकर या दिग्गजांच्या उपस्थित उदघाटन समारंभ होणार आहे. 
 
       संमेलनाध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्वात नाट्य संमेलन मुख्य समिती, स्वागत समिती, स्टेज व्यवस्थापन समिती, भोजन समिती, निवास समिती, नाट्य निवड समिती, सांस्कृतिक समिती, पुरस्कार समिती, महिला व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व प्रचार समिती, आर्थिक समिती, निर्माता संघ, कलावंत संघ, वाद्य संघ, मंडप व डेकोरेशन संघ, झाडीपट्टी रंगकर्मी व रसिक यांच्यासह संपूर्ण टीम तसेच हजारो हात परिश्रम करीत आहेत.