कीर्तनकार ते आमदार : उद्धवरावजी शिंगाडे - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

कीर्तनकार ते आमदार : उद्धवरावजी शिंगाडे

दुःखद वार्ता....
सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा माजी आमदार मान. उद्धवरावजी शिंगाडे यांचे दुःखद निधन


.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच झाडीपट्टी प्रदेशात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले उद्धरावजी अंतारामजी शिंगाडे यांचे आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या जन्मगावी चिंचोली (बु) येथे दुःखद निधन झाले . गेल्या दोन वर्षापासून ते आजारी होते .मृत्यू समयी त्यांचे वय अंदाजे 82 होते. त्यांचे शिक्षण केवळ इयत्ता तिसरी पर्यंत झाले होते. आणि त्यांचे वडील सुद्धा अंतारामजी शिंगाडे सुद्धा कीर्तनकार होते. पंढरीचे वारकरी होते.भजन कीर्तनाचा महान वारसा त्यांच्या वडिलांकडून त्यांना प्राप्त झाला होता . त्यांच्या वडीलांना सुद्धा 103 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. उध्दवरावजी सुरुवातीच्या काळात चिंचोली येथे टेलरचा व्यवसाय करायचे . प्रथमता ते चिंचोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. 
नंतर ते ग्रामपंचायत चिंचोली चे पंधरा वर्षे सरपंच राहिलेत. ब्रह्मपुरी पंचायत समिती सभापती ,जिल्हा परिषद सदस्य आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे अर्पण केली.‌ झाडीपट्टी हा नाटकाचा प्रदेश असल्याकारणाने सुरुवातीला त्यांनी अनेक नाटकं लिहिली आणि झाडीपट्टी रंगभूमीवर ती गाजली सुद्धा. 'अशीच राहावी प्रीत साजना, दारूपायी विकली बाई, कीर्तन खरा की तमाशा बरा , वेशेच्याद्वारी येती ब्रह्मचारी, भट भुलला भिल्लीणीला आदी अनेक नाटकं त्यांनी लिहून काढले. 'पैशाच्या पाऊस' या नाटकात त्यांनी केलेली भूमिका अजरामर ठरली होती. एक उत्तम कलावंत , नाट्य लेखक ,उत्तम प्रबोधनकार ,कीर्तनकार आणि लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यात प्रामाणिक सेवा केली. महाराष्ट्रात जेव्हा राज्य शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरू केलेली होती. त्यावेळेस त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन अनेक गावे झाडून काढली होती. दिवसा गाव झाडणे आणि सायंकाळी त्या गावात जाऊन कीर्तन करणे असा ' गाडगेबाबा प्रणित उपक्रम' त्यांनी अनेक दिवस राबविला. त्यांच्या या कार्यामुळे प्रभावित होऊन नांदगाव (जानी) या गावच्या लोकांनी स्वच्छ ग्राम स्पर्धेत पारितोषिक पटकावले  होते.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पावन सहवास त्यांना बालपणीच लाभला होता . वं. राष्ट्रसंतांचे अनेक भजनं त्यांनी मुखोद्गत केले होते . कर्मयोगी संत  तुकाराम दादा गीताचार्य यांच्याही ग्रामस्वराज्य अभियानात ते सदैव सक्रिय असायचे.  राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे ते  मार्गदर्शक राहिलेले आहेत. राज्यस्तरीय  राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात  त्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन सदैव गुरुदेव सेवकांना ऊर्जा देणारे असायचे.  राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा " समर्पित जीवन पुरस्कार " त्यांना देण्यात आला होता.  त्यांनी आयुष्यभर निष्काम सेवा केली. कुठल्याही  शैक्षणिक संस्था न काढता केवळ जनतेच्या सेवेत ते  राहिले. सदैव ते एसटीने प्रवास करायचे. एसटीमध्ये कोणी गरीब जर मिळाला तर त्याला आवर्जून मदत करायचे . मागील कोरोना काळात त्यांच्या दोन्हीही मुलांचे दुःखद निधन झाले .  त्यामुळे ते फार दुःखी झाले होते.....


 अशा या  राष्ट्रसंताच्या पाईकास- ज्येष्ठ लोकसेवकास,  गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आणि झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो....

 बंडोपंत बोढेकर, गडचिरोली