IGNOU | ‘कमवा आणि शिका योजना’ | ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन | Bachler-Business-Administration-Service-Management - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

IGNOU | ‘कमवा आणि शिका योजना’ | ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन | Bachler-Business-Administration-Service-Management

जिल्हा परिषद सेस फंडातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘कमवा आणि शिका योजना’* या योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन.

*योजनेचा मूळ उद्देश:*
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील बरेचसे होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. इयत्ता १२ वी पास झाल्यानंतर पुढे पदवीपर्यन्त शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बारावी नंतर पारंपारिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पदवी मिळवू इच्छिणारे बरेचसे विद्यार्थी हे हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण अर्धवट सोडतात किंवा घेण्यास ते पूर्ण करण्यास असक्षम असतात, अशा विद्यार्थ्यांना पुढील पदवी शिक्षणाची संधी मिळावी आणि शिक्षण घेत असताना त्यांचे अर्थार्जन सुद्धा व्हावे ही आज महत्वाची सामाजिक गरज आहे. पारंपारिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेताना, कर्मशील ज्ञानाच्या अभावामुळे पदवी पूर्ण होऊन सुद्धा काही होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आज मागे पडताना आपल्याला आढळून येत आहे. काही विद्यार्थी हे पदवी पूर्ण होऊनसुद्धा सुशिक्षित बेरोजगार म्हणून मागे रहात आहेत.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सध्या विविध योजनांचे तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध मिशनमोड वरील समाजोपयोगी प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर चालू आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बऱ्याच वेळेला विहित मुदतीमध्ये कामाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य करणे आव्हानात्मक झालेले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि कालसुसंगत असा उपयुक्त वापर करून कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता आणणे आणि प्रलंबित कार्यालयीन कामकाजाचा विहित मुदतीमध्ये निपटारा करणे ही आता सर्व शासकीय कार्यालयांची मोठी गरज बनलेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारावी पास असलेल्या होतकरू आणि गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, पुढील पदवीचे शिक्षण घेताना / घेतल्यावर नोकरीसाठी आवश्यक ते सर्व ज्ञान – कौशल्ये ही त्यांच्या दैनंदिन कामातून मिळावीत, असे प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण घेताना त्यांना ३ वर्षासाठी निश्चित विद्यावेतन सुद्धा मिळावे यासाठी जि. प. सेस फंडातून नावीन्यपूर्ण योजना राबवावी अशी बाब चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या विचाराधीन होती. सबब चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग मध्ये तीन वर्षासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजना राबविली जाणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachler in Business Administration (Service Management) या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद चंद्रपुर मध्ये तीन वर्षासाठी इंटर्न शिप दिली जाणार आहे. ज्यातून सदर मुलांना प्रशासकीय कामाचा, सेवा व्यवस्थापनाचा अनुभव मिळेल, काम करायला मिळेल आणि केलेल्या कामापोटी प्रती महिना विद्यावेतन सुद्धा मिळेल जेणेकरून मुलांना त्यांचे पदवीचे शिक्षण स्वत: च्या हिमतीवर घेण्यास मदत होईल. थोडक्यात कामाचे कार्यालयीन ठिकाण हेच या विद्यार्थ्यांचे तीन वर्षासाठी त्यांच्या महाविद्यालयासारखे असणार आहे. ही मुले एमकेसीएल ने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक ऑनलाइन साहित्याच्या मदतीने ऑनलाइन अभ्यास करतील आणि पदवी अभ्यासक्रम सुद्धा काम करीत असताना पूर्ण करतील.

*योजनेच्या लाभाचा तपशील:*

दरवर्षी किंवा प्रथम तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्याने केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. ८,०००/- दुसर्‍या वर्षी रु. ९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.

सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसर्‍या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachler in Business Administration (Service Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापराकरिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, (एमकेसीएल) यांच्या मार्फत Non-Returnable basis वर एक उत्तम स्मार्टफोन सुद्धा मोफत दिला जाणार आहे.

*योजना अटी आणि शर्ती:*

१) लाभार्थी हा चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.

२) लाभार्थी विद्यार्थी हा अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती प्रवर्गातील व बारावी पास असावा.

३) लाभार्थ्यास इयत्ता १२ वी मध्ये शाखानिहाय (विज्ञान, कला, वाणिज्य, समकक्ष इतर शाखा) मिळालेल्या सर्वोच्च गुणांनुक्रमाचा आणि बारावी फ्रेशर विद्यार्थ्यांचा इंटर्नशिप निवडीवेळी प्राधान्याने विचार केला जाईल.

४) लाभार्थी हा संगणक साक्षर असावा.

५) दिनांक ३० जून २०२२ रोजी लाभार्थ्याचे वय हे १८ पूर्ण ते २५ वर्षे दरम्यान असावे.

६) बीबीए पदवी अभ्यासक्रमासंदर्भात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे लाभार्थ्याला पालन करावे लागेल.

७) इंटर्न म्हणून काम करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत निवड पत्र मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाची प्रती वर्ष रु. २०,०००/- या प्रमाणे ३ वर्षे फी ही स्वत: भरावयाची आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या कार्यआधारित पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित विद्यार्थ्याची प्रवेश निश्चिती केल्यावरच इंटर्नशिप सुरू होणार आहे.

८) कामाच्या संदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करण्याची जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्याची असेल. सदर नियमांचे पालन न झाल्यास अथवा समाधानकारक काम नसल्यास अशा विद्यार्थ्याची कार्यालयीन सेवा कधीही थांबविण्याचा अधिकार हा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला असेल.

९) सदर योजना ही तीन वर्षानी बीबीए पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास चंद्रपूर जिल्हा परिषदे मध्ये कायमस्वरूपी अथवा कंत्राटी स्वरूपाच्या नोकरीची ऑफर / आश्वासन देत नाही.

१०) इंटर्नशिपसाठी रुजू होतेवेळी विद्यार्थी उमेदवाराने, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दिलेले ऑफर लेटर काळजीपूर्वक वाचावे. आणि त्यातील दिलेले नियम आणि अटी व शर्तींचे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यन्त काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. निवड केलेल्या लाभार्थ्याने इंटर्नशिप अर्धवट सोडून जाऊ नये म्हणून निवड झाल्यानंतर लगेच बंधपत्र करून देणे आवश्यक आहे.

११) सदर योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यास कोणत्याही नियमित पदावर हक्क सांगता येणार नाही. तसेच सदर निवडीच्या आदेशाने त्यांना कोणत्याही न्यायालयात वा प्राधिकरणाकडे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सेवेत नियमित करण्यास्तव दाद मागता येणार नाही.

१२) इंटर्नच्या निवड संख्येमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्वाधिकार हे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने राखून ठेवलेले आहेत.

*आवश्यक कागदपत्रे:*

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) जात प्रमाणपत्र
४) शिधापत्रिका- मागील आणि पुढील बाजू
५) दहावी उतीर्ण प्रमाणपत्र
६) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
७) MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

*निवडप्रक्रिये बाबत महत्वाचे नियम, अटी व सूचना*

१ चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या मदतीने आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ आणि २३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. सदर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची काम करण्याची तयारी, संगणक व इतर कार्यकौशल्ये, एकूण व्यक्तिमत्व आणि काम करण्याची मानसिकता एत्यादी गोष्टी पहिल्या जातील.

२ जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यापीठाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची प्रारंभिक पडताळणी केली जाईल.

३ चांगले संगणक कौशल्ये असलेल्या संबंधित विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या निवड समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीला बोलावले जाईल आणि जिल्हा परिषदेच्या निवड समिती मार्फत ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे त्यातील निवडक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना ३ वर्षाच्या इंटर्नशिप करिता निवडले जाईल.

४ इंटर्नशिप करिता निवड झालेल्या सर्व इंटर्न ला पदवीसाठीच्या प्रारंभिक अर्ज प्रक्रियेनंतरच्या पुढील टप्प्यावर आवश्यक असणारे ऑफर लेटर (निवड पत्र) चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने निर्गमित केले जाईल.

५. निवड झालेल्या सर्व इंटर्न ची नावे IGNOU च्या बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जप्रक्रियेसाठी निवड झालेल्या दिवशी विद्यार्थ्यांची प्रक्रिया पार पडली जाईल. त्यामुळे मुलाखतीला येताना विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर लगेच विद्यापीठाची प्रथम वर्षाची फी रु. २० हजार त्याच भरण्याची तयारी असावी.

* इंटर्नच्या निवड संख्येमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्वाधिकार हे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने राखून ठेवलेले आहेत.

६. प्रत्यक्ष मुलाखती नंतर निवड झाल्यानंतर मुलांची IGNOU बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट ) या पदवी परीक्षेसाठी त्याच दिवशी प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या दिवशी सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.

७ इंटर्नशिप करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यानी प्रथम वर्षाची फी भरल्यानंतरच बीबीए (सर्व्हिस मॅनेजमेंट) या पदवी अभ्यासक्रमाला IGNOU च्या वतीने संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होईल.

८. इंटर्नशीप करिता चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने निवडलेल्या आणि IGNOU तर्फे प्रवेश निश्चित झालेल्या संबंधित इंटर्न विद्यार्थ्यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये प्रत्यक्ष कामावर दिनांक १ सप्टेंबर पासून पुढील ३ वर्षांकरिता रुजू करण्यात येईल. आणि इंटर्न शिप दरम्यान च्या काळामध्ये प्रथम वर्षी प्रती महिना ८ हजार रुपये विद्यावेतन, दुसर्‍या वर्षी प्रती महिना ९ हजार रुपये विद्यावेतन आणि तिसर्‍या वर्षी प्रती महिना १० हजार रुपये विद्यावेतन हे घालून दिलेल्या नियम आणि अटींच्या अधीन राहून देण्यात येईल.

*ऑनलाइन अर्जाची लिंक*

https://tinyurl.com/zpchanibba2022