हरणघाट प्रकल्‍पातून पुढील दोन दिवसात पाणी सोडणार - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०२२

हरणघाट प्रकल्‍पातून पुढील दोन दिवसात पाणी सोडणार
*आ. मुनगंटीवार यांनी घेतला हरणघाट व इतर प्रकल्‍पांचा आढावा व दिले सक्‍त निर्देश.*
गेले काही दिवसांमध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे जिल्‍हयातील व मुल-बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील काही सिंचन प्रकल्‍प क्षतीग्रस्‍त झाले आहेत व त्‍यामुळे शेतक-यांना पेरणीचा हंगाम सुरू असताना पाणी मिळत नाही. अशा तक्रारी त्‍यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केल्‍या त्‍याची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी सिंचन विभागातील अधिकारी व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची तातडीची बैठक लावली. त्‍याआधी त्‍यांनी आपल्‍या स्‍वीय्य सहाय्यकांना पदा‍धिका-यांसहीत मुल जवळील नलेश्‍वर मध्‍यम प्रकल्‍पाला भेट देण्‍यास सांगीतले. तशी भेट दिल्‍यानंतर प्रकल्‍पाला काही ठिकाणी तातडीच्‍या दुरूस्‍तीची गरज आहे असे आ. मुनगंटीवार यांना सांगण्‍यात आले.
या सर्व पार्श्‍वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना नलेश्‍वर प्रकल्‍प व विधानसभा क्षेत्रातील अन्‍य प्रकल्‍पांच्‍या तातडीच्‍या दुरूस्‍तीसाठी अंदाजपत्रक बनविण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार तातडीने अंदाजपत्रक तयार करून ते विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला सादर करावे व त्‍यांचेकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर ही दुरूस्‍ती करावी असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. यावेळी अधिका-यांनी आपले प्रस्‍ताव पुर्वीप्रमाणेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा ऐवजी पाटबंधारे विभागाच्‍या मंडल कार्यालयाला पाठविण्‍याची पध्‍दत सुरू करावी, अशी विनंती आ. मुनगंटीवार यांना केली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
चंदपूर जिल्‍हयातील हरणघाट प्रकल्‍पातुन अनेक शेतक-यांना पाणी उपलब्‍ध होते. ज्‍यामुळे अनेक शेतक-यांना त्‍यांचा फायदा होतो. गेल्‍या काही दिवसांपासून तिथे बांधकाम सुरू असल्‍यामुळे तेथुन पाणी पुरवठा होत नाही. याची तक्रार आल्‍यावर आ. मुनगंटीवार यांनी प्रकल्‍पाच्‍या कार्यकारी अभियंत्‍याबरोबर दुरध्‍वनीवरून बोलणी केली असता तेथील ट्रान्‍सफॉर्मर चोरीला गेले व तेथील विज बिल मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. त्‍यामुळे पाणी पुरवठा देण्‍यास विलंब होत आहे. यामुळे हरणघाट बरोबरच वाघोली बुटी व बोरघाट प्रकल्‍पातुन सुध्‍दा पाणी सोडता येत नाही. यावर आ. मुनगंटीवार यांनी पुढील दोन दिवसात या प्रकल्‍पांमधून पाणी सोडण्‍याचे निर्देश दिले. जे कार्यकारी अभियंता यांनी मान्‍य केले. या प्रकल्‍पाच्‍या दुरूस्‍तीसाठी अंदाजपत्रक तयार करून ते ताबडतोब शासनास पाठविण्‍याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.
अतिवृष्‍टीमुळे जिल्‍हयातील मामा तलाव, लघु पाटबंधारे प्रकल्‍प व मध्‍यम पाटबंधारे प्रकल्‍प यांच्‍या तातडीच्‍या दुरूस्‍तीसाठी अंदाजे १० कोटी रूपये लागणार असल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले. त्‍यावर आ. मुनगंटीवार यांनी त्‍याचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविण्‍याचे निर्देश दिले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की, अनेक वर्ष टिकले असे काम आपण केले पाहीजे, जेणेकरून वारंवार दुरूस्‍ती करण्‍याची गरज पडू नये.


या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा संध्‍याताई गुरनुले, पंचायत समितीच्‍या माजी सभापती अलकाताई आत्राम, मुल नगर परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष नंदकिशोर रणदिवे, विनोद देशमुख, अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार उपस्थित होते.