राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर पर्यावरण प्रेमी बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ जुलै २०२२

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर पर्यावरण प्रेमी बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे वन आणि वन्य प्राण्यांना राजश्रय मिळाला; पर्यावरण प्रेमी बंडू धोत्रे यांची प्रतिक्रिया


राज्यातील सत्ता संघर्षात हिरव्या विचाराचे पहिले मुख्यमंत्री, जन-वन-जंगल-जमीन ला 'राजाश्रय' देणारे उद्धव ठाकरे व राज्याच्या एकंदरित पर्यावरणाचे विषय विविध पातळीवर अत्यंत प्रभावीपणे मांडणारे व त्यासाठी आग्रही राहिलेले 'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे सारखे या खात्याचे मंत्री पुन्हा होणे नाही. आम्हा हिरव्या विचारांच्या, चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांना आपली उणीव कायम जाणवेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे (bandu Dhotre) यांनी Twitter/ Facebook वर व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, राज्यात सत्तांतर होताच 'आरे' वर 'आरी' चालविण्याचा निर्णय प्राधान्याने घेण्यात आला, विकास कोणता? कशाला? कुणासाठी? हे जोपर्यंत कळणार नाही, मानवासाठी निसर्गाचे महत्व कळणार नाही तर अशीच निर्णय होतील. पूर्वी 'आरे' वाचविण्याकरिता आंदोलन सुरु होते. मुख्यमंत्री होताच सेव्ह आरे फॉरेस्ट ला 'राजाश्रय' मिळते, आणि काल नवीन मुख्यमंत्री- नवीन सरकार येताच काही तास नाही होत, तर 'आरे फारेस्ट' विरुद्ध निर्णय घेतला जातो.

मागील अडीच वर्षात वन-वन्यजीवाच्या म्हणजे एकूणच जंगल-निसर्ग-पर्यावरणाच्या बाजूने अनेक निर्णय घेण्यात आले. अभयारण्य, अनेक जिल्ह्यात संवर्धन राखीव क्षेत्र घोषित झाल्याने संरक्षित क्षेत्रात वाढ झाली. पर्यावरणाच्या अनेक प्रश्नाला कुणीतरी वाली आहे याची जाणीव झाली. कधी नव्हे तेवढा वेळ या विषयाच्या बैठकीस मा. मुख्यमंत्री यांचा महत्त्वाचा वेळ मिळू लागला. आवर्जून बैठका लावून प्रश्न सोडविले जायचे, असेही बंडू धोत्रे यांनी म्हटले आहे.

देशाचे राजकारण हिरवा विचार विरहित म्हणजे राज्याचे, देशाचे नव्हे संपूर्ण वसुंधरेचे म्हणजेच मानव जातीचे नुकसान असते. आधीच विकासाच्या घोड़दौड मधे आपण सारे निसर्गाची अपरिमित हानि करीत पुढे जात आहोत. अशात जे शिल्लक आहे त्याचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बंडू धोतरे यांनी दिली.

Uddav Thakre Aditya Thakre environment wildlife forest Mumbai maji Vasundhara bandu Dhotre