फक्त पिकं नव्हे संपूर्ण हंगाम बुडाला..! #Rain #flood - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, जुलै २७, २०२२

फक्त पिकं नव्हे संपूर्ण हंगाम बुडाला..! #Rain #floodमागील दोन आठवड्यापासून महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पाऊसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला आतापर्यंत दोनदा प्रचंड पूर आला असून वर्धा नदीच्या पूरामुळे साधारण ४० गावे प्रभावित झाले आहेत. या पूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातील मुख्यत्वे कापूस आणि सोयाबिन पिकाची प्रचंड हानी झाली आहे. वर्धा नदीच्या परिसरात प्रमुख पिकं म्हणून कापूस आणि सोयाबीन घेतले जाते. या पूरामुळे हे दोन्ही पिकं प्रचंड प्रभावित झाले असून जिथं जिथं पूराचे पाणी घुसले तिथं तिथं संपूर्ण पिकं नष्ट झाली आहे.
‘पूरामुळे पिकं बुडाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे’, असे सर्वत्र बोलले जात आहे. पण हे अर्धसत्य आहे. पूरामुळे फक्त पिकं बुडाली नाही तर संपूर्ण हंगाम बुडाला आहे. आजही पूर ओसरलेला नाही, समजा येत्या दोन दिवसात पूर ओसरला तरी देखील संपूर्ण वारानी येऊन जमीन पेरणी योग्य करण्यासाठी इथून किमान १२ -१५ दिवसं लागतील. सोयाबीन आणि कापूस लागवडीचा कालावधी बघता, लवकरच येणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बघता आता सोयाबीन आणि कापूस लागवट शक्य दिसतं नाही. समजा काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली देखील तरी त्याचा खर्च निघेल यांची शाश्वती नाही. यावर्षी वाढलेल्या बी-बियाणे, खतांच्या किमंती बघता दरवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के जास्तं पैसा खर्च करून उभारलेली शेती तर पाण्यात गेलीच परंतु इथून वर्धा नदी परिसरातील ४० गावाची वाटचाल ही नापिकीकडे आहे, हे जास्त गंभीर आणि भयावह आहे.


पूरामुळे पिकांसोबत शेतजमिनीचे सुद्धा नुकसान..!
शेतामध्ये साठवून ठेवले खते, बियाणे आणि इतर शेतपयोगी वस्तू पूराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेच सोबतच पूराच्या धारेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. अनेक जागी शेतातील बांध उद्धवस्त झाले आहे. शेतीतील सुपीक गाळ वाहून जाणे ही कुठल्याही शेतजमिनीची प्रचंड मोठी हानी असते.

शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा.
पिककर्जच्या मदतीने उभारलेली शेती बुडाल्यामुळे यापुढील कारभार कसा चालवावा असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना सद्यास्थित पडलेला आहे. शासनाने सर्वत्र एकच निकष लावत सरसकट मदत लागू करण्यापेक्षा संपूर्ण हंगाम गेलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळी मदत करण्याची गरज आहे. नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई सोबतच शेतजमीनी व्यवस्थित करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे.
-
सतीश गिरसावळे, राजुरा, चंद्र्पुर..