त्याची 'मनीषा'च हिरावली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ जुलै २०२२

त्याची 'मनीषा'च हिरावली
तिची सोबत म्हणजे सारं विश्व जिंकण्याचे बळ असायचे. तीचे अचानक सोडून जाणे, हे फक्त धक्का नसून नियतीने काळजावर कायमचा घातलेला आघात आहे.
...................

ते म्हणतात ना, नियतीसमोर कुणीही बलाढ्य नसतो. नियती कुणाशी कोणता गेम खेळेल, याचा काहीच नेम नाही. या नियतीने मला हलवून सोडणारा धक्का दिलाय. अशीच एक न विसरणारी आणि कायम मनात आठवणीतील घर करून ठेवणारी दुःखद घटना घडली. माझी मैत्रीण आणि पत्नी मनीषा हिच्या निधनाने माझ्यावर सारं आभाळ कोसळलंय. क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी, शासकीय तीन-चार परीक्षा उत्तीर्ण करणारी आणि त्याहीपेक्षा दयाळुवृत्ती असणारी मनीषा हिच्या जाण्याचे अतीव दुःख झाले. तिला कर्करोगाने आपल्या विळख्यात ओढले आणि सुरु झालीय ती धावपळ. क्रीडा स्पर्धेत समोरच्याला चितपट करणारी कर्करोगाशी मात्र जिंकू शकली नाही. असं वाटलं सर्व परिस्थिती हळूहळू का होईना सुरळीत होईल, पण नियतीला ते मान्य नव्हतं. आणि झालं तेच जे कुणालाही पचविने कठीण आहे. तिला झालेल्या कर्करोगाला काही काळ तिने नियंत्रणात ठेवले. पण, तो कर्करोग मानायला तयारच नव्हता. अशा दयाळू आणि प्रेमळतेच्या मूर्तीला संपविण्याचे जणू काही त्याने वचनच घेतले होते. चला कर्करोगाला किमोथेरपी नष्ट करते, तीही दिली. रेडियशनने बरा होतो, मग त्याच्या मागे लागायचे.नागपूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे,दिल्ली येथील डॉक्टरांचा सल्लाही घेण्यात आला. पुन्हा तेच चक्र सतत सुरु असायचे. मग कुणी सांगितले अमुक करा तमुक करा त्याच्या मागे लागायचे.

अखेर सर्वस्वी अपयश आले. आणि मनातील विचारांची घालमेल करणारी घटना घडलीच. हेच कळेना, कुणाच्याही लेण्यात ना देण्यात ती,सर्वांप्रती आदरभाव, दयाळुपणा, अन्यायाची तिला प्रचंड चीड होती. तरीही परमेश्वराला तिचे जमिनीवर असणे मान्यच नव्हते. असो काहीही, पण आपल्या हाती काहीही नाही. या जगात दुःख विकत घेणारा कुणीही कोट्याधीश अजून तरी समोर आलेला नाही. जे आव्हान आहे ते स्वीकारावच लागेल. अखेर नियतीने माझ्या मनीषासह 'मनीषा'ला हिरावले. या कठीण प्रसंगात मला माझे आई-वडील, तिचे कुटुंब,माझ्या वडिलांचे मित्र आणि लोकांनी अविरत सहकार्य केले. विशेष म्हणजे तहसीलदार प्रवीण पांडे यांचा मला वेळोवेळी मोलाचा सल्ला आणि मदत मिळाली.

माझ्या लिखाणाची होती 'दिवाणी'

बारा वर्षांच्या पत्रकारितेत वृत्तपत्र, इलेक्ट्रानिक, सोशल मीडियातील बलाढ्य ग्रुपसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. तिला मीडियाची खूप 'क्रेज' होती. पण, मी तिला सांगितलं, या क्षेत्रात दिव्याखाली कसा अंधार असतो. त्यानंतर शासकीय नोकरीत आलोय. परंतु, ती म्हणायची, 'तू लिखाण सोडू नको, तू खूपच भारी लिहतोय'. मला पत्रकारितेत बरेच पुरस्कार मिळाले, माझ्या अनेक वृत्तांच्या जनहित याचिका दाखल केल्या गेल्या. काही तर स्वतः हुन (सु मोटो)न्यायालयाने दाखल करून घेतल्या. तर, काहींचे शासन निर्णय निघाले. पत्रकारितेचं कामकाज कसं चालतंय, हे जाणून घेण्यासाठी मी तिला एका मीडिया हाऊस मध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा तेथील वरिष्ठ संपादकांनाही त्यांना न उलगडनारे विविध विषयांवरील प्रश्न ती विचारायची. प्रचंड, आशावादी,उत्साही, बुद्धिमत्तेची धनी होती. तिने मला नेहमी लिखाणासाठी प्रोत्साहन दिले, माझा आत्मविश्वास उंचावला आणि भरभरून प्रेम दिले. मनीषा अर्थ विभागात कार्यरत होती. तिला अर्थकारणाशी निगडित बऱ्याच बारीक सारीक बाबींचा अभ्यास होता. तिच्या आर्थिक
विश्लेषणाचा मला शेअर मार्केटमध्ये भरपूर लाभ मिळाला. तिची पोकळी भरून निघणे खरंच अशक्य आहे. तिला भावपूर्ण श्रद्धांजली.

-मंगेश दाढे
............