झॉलिवूड’ वाद: झाडीपट्टी निर्माता संघटनेने घातली आजन्‍म बंदी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, जून २७, २०२२

झॉलिवूड’ वाद: झाडीपट्टी निर्माता संघटनेने घातली आजन्‍म बंदी

झाडीपट्टी निर्माता संघटनेने घातली आजन्‍म बंदी


‘झॉलिवूड’च्‍या लेखिकेला बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न

झाडीपट्टी निर्माता संघटनेने घातली आजन्‍म बंदी
नागपूर,24 जून

विविध आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवांमध्‍ये गाजलेल्‍या, महाराष्‍ट्रभर नुकत्‍याच प्रदर्शित झालेल्‍या आणि सर्व स्‍तरातून कौतूक झालेल्‍या ‘झॉलिवूड’ या चित्रपटाची लेखिका व अभिनेत्री आसावरी नायडू यांच्‍यावर झाडीपट्टी निर्माता संघटनेने आजन्‍म बंदी घातली आहे. सोशल माध्‍यमांवर आसावरी नायडू यांची बदनामी करण्‍याचा प्रयत्‍न केला जात असून त्‍यांचा पोटापाण्‍याचा व्‍यवसायच या संघटनेने ह‍िरावून घेतला आहे.

सात वर्षांच्‍या अथक प्रयत्‍नांनंतर पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची पार्श्‍वभूमी लाभलेला ‘झॉलिवूड’ हा चित्रपट तयार झाला आहे. ‘झॉलिवूड’ हा चित्रपट झाडीपट्टीचा इतिहास सांगणारा माहितीपट नसून झाडीपट्टी रंगभूमीवर घडलेल्‍या काही निवडक सत्‍य घटनांचा आधार घेऊन त्‍यांना एका काल्‍पनिक कथेत गुंफून अत्‍यंत प्रामाणिक हेतूने तयार केलेला आहे. या चित्रपटाची कथा झाडीपट्टी अभिनेत्री आसावरी नायडू यांची असून दिग्दर्शन व पटकथा तृषांत इंगळे यांची आहे. हा चित्रपट 3 जून 2022 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. फ्रान्स चित्रपट महोत्सवात स्पेशल ‘ज्युरी अवॉर्ड’ ने सन्मानित करण्‍यात आले असून ‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमानेही या विदर्भात तयार झालेल्‍या चित्रपटाच्‍या कलावंतांना विशेषत्‍वाने आमंत्रित करण्‍यात आले होते. चित्रपट व साहित्‍य क्षेत्रातील अनेक दिग्‍गज लोकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतूकही केले होते. एकीकडे, सर्वत्र चर्चिल्‍या गेलेल्‍या चित्रपटावर व लेखिका आसावरी नायडू यांच्‍यावर मात्र, झाडीपट्टी निर्माता संघटनेचे अध्‍यक्ष परमानंद गहाणे व झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाने बहिष्कार टाकला आहे. आसावरी नायडू यांनी झाडीपट्टीची बदनामी केल्‍याचे कारण पुढे करत या दोन संघटनांनी त्‍यांच्‍यावर आजन्‍म बंदी घातली आहे.

आसावरी नायडू या मागील 22 वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्‍यांचे वडील प्रभाकर आंबोणे व आई वत्‍सला पोलकमवार-आंबोणे यांनीदेखील 40 वर्ष झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली आहे. त्‍यांचे सासरे ज्‍येष्‍ठ रंगकर्मी गणेश नायडू हे नागपुरातील रंगभूमीवरचे एक प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती म्‍हणून ओळखले जातात. झाडीपट्टी रंगभूमी हे आसावरी नायडू यांचे अर्थार्जनाचे माध्‍यम असून त्‍याच्‍यावर झाडीपट्टी संघटना व विकास महामंडळाने घाव घातला आहे.

मानसिक खच्चिकरण करण्‍याचा प्रयत्‍न

‘झाडीपट्टी निर्माता संघटना व झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळाने आजन्‍म बंदी घालत माझ्यावर अन्‍याय केला असून झाडीपट्टी कलावंत म्‍हणून असलेले माझे अस्तित्‍व संपविण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सोशल माध्‍यमांवर माझा निषेध, बहिष्‍कार टाकणारे आक्षेपार्ह व अपमानजनक पोस्‍ट टाकून माझे मानसिक खच्चिकरण करण्‍यात येत आहे. एक स्‍त्री कलावंत या नात्‍याने माझ्या अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यावर घातलेला हा घाला आहे’, असा आरोप आसावरी नायडू यांनी केला आहे.

कायदेशीर कारवाई करणार

चित्रपटाशी संबंधित निर्माता, दिग्‍दर्शक, कलावंत या सर्वांना सोडून परमानंद गहाणे, देवेंद्र दोडके, शेखर डोंगरे, प्रल्‍हाद मेश्राम, युवराज गोंगले, प्रियंका गायधने, ज्ञानेश्‍वरी कापगते, प्रतिभा साखरे, सुषमा चांदेकर इत्‍यादी मंडळींनी झाडीपट्टी नाट्य नाट्य महामंडळ व झाडीपट्टी निर्माता संघटनेच्‍या व्‍हॉट्सअॅप ग्रुपवर आसावरी नायडू यांची बदनामी करणारे व त्‍यांच्‍यावर बंदी घालणारे पोस्‍ट टाकण्‍यात आले. इतका मोठा निर्णय घेण्‍याआधी या लोकांनी एकदाही माजी बाजू ऐकून घेण्‍याचे सौजन्‍य दाखवले नाही. एक स्‍त्री कलावंत म्‍हणून फक्‍त माझ्या उदरनिर्वाहाचाच नाही तर माझ्या अस्मितेचा हा प्रश्‍न आहे. माझी बाजू सगळ्यांसमोर मांडण्‍यासाठी आता कायद्याला शरण जाण्‍याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय शिल्‍लक नाही त्‍यामुळे माझ्यावर झालेल्‍या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी नाईलाजाने मला कायदेशीर कारवाई करणे भाग आहे, असे आसावरी नायडू यांनी म्‍हटले आहे.