मोडी लिपीची सहावी राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२२

मोडी लिपीची सहावी राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण !
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०२२ या दिवशी सहावी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, पुणे, नगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरविण्यात आली. चारही केन्द्रांवर मिळून ४० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात जास्त वयाचे श्री. गिरीश भागवत, ८२ वर्षे हे  सहभागी झाले होते.
या स्पर्धेत कोल्हापूर येथे वयाची  सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठजनही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यंदा चारही शहरामध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केन्द्रावरील व्यवस्था सर्वोत्तम होती.  सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केन्द्रावर मिश्र वयोगट होते. काही स्पर्धकांनी  सलग सहाव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. जळगाव, दापोली, अंबरनाथ अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले तर विदर्भातून काही स्पर्धक पुणे केन्द्रावर पोहोचले होते. 
स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री.रणजीत सावरकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच  पुढील वर्षी अधिक शहरांचा समावेश यात केला जाईल, असे त्यांनी  सांगितले. जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे अध्यक्ष  राजेश खिलारी, पुणे केंद्राचे प्रमुख परेश जोशी, नगर केंद्र प्रमुख संतोष यादव आणि कोल्हापूर केंद्र प्रमुख नवीनकुमार माळी, तसेच जागतिक मोडी लिपी प्रसार समितीचे कार्यकर्ते विलास कडू, सौ. नेहा खवळे यांचे त्यांनी कौतुक केले.