परसोडी रैयत,पांढरवानी येथील तेंदूपत्ता संकलक मजुरांचा वन्यजीव विभागाशी संघर्ष.नवेगावबांध व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, मे ०४, २०२२

परसोडी रैयत,पांढरवानी येथील तेंदूपत्ता संकलक मजुरांचा वन्यजीव विभागाशी संघर्ष.नवेगावबांध व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण.


नवेगावबांध व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.४ मे:-
अर्जुनी मोरगाव -सडक अर्जुनी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या परसोडी रैयत,पांढरवानी येथील ग्रामस्थ तेंदुपत्ता संकलना साठी नवेगावबांध नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्पात जात असताना, वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना संरक्षित वनातून तेंदूपत्ता संकलण्यासाठी मनाई केल्यामुळे, संरक्षित क्षेत्र व राखीव क्षेत्राच्या सीमेवर वन्यजीव संरक्षण विभागाचे अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यात संघर्ष पेटला आहे. त्यामुळे या परसोडी गावालगत व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी तेंदूपत्ता संकलन साठी राखीव जंगलात गेलेल्या महिलांचे वन कर्मचाऱ्यांनी महिलांचे कपडे फाडले, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली, वनकर्मचारी अंगावर कुर्‍हाड घेऊन धावले. असे आरोप परसोडी पांढरवाणी येथील तेंदूपत्ता संकलन साठी गेलेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांनी केले आहेत. तर आम्ही सकाळपासूनच त्यांना चर्चा करून व शांततेने समजावत आहोत. गावकऱ्यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.असे वनक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी सांगितले आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. जोपर्यंत तेंदूपत्ता राखिव जंगलातून संकलन करू देणार नाही. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. अशी भूमिका परसोडी पांढरवानी या गावातील ग्रामस्थांनी घेतल्यामुळे वन्यजीव विभाग व गावकरी यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून, गोंदिया जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. वन्यजीव संरक्षण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार व त्यांचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हा प्रश्न भारत सरकारशी संबंधित असून, यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. 
अधिकाऱ्यांना सांगितलेली बाबी गावकरी ऐकण्यास तयार नव्हते. आंदोलन होत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आंदोलन करते व अधिकारी या दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, त्यांनी नागरिकांना समजावून सांगितले व त्याठिकाणी त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्न केले.एवढेच नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून तणाव कसा निवळता येईल?यातून मार्ग कसा काढता येईल? याकरिता व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य संचालक गवळा यांच्याशी दूरध्वनीवरून बोलले व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्यासोबत सुद्धा दूरध्वनीवरून बोलून काय मार्ग काढता येईल?.यावर सखोल चर्चा केली व आंदोलनकर्त्यांची समजूत काढली.परंतु आंदोलन करते ग्रामस्थ यांनी आंदोलनातून माघार घेतली नाही.परसोडी रयत येथील नागरिक वनहक्क समिती अंतर्गत तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी व पंधरा दिवसाचा हंगाम असल्याने कुटुंब ची उपजीविका चालविण्यासाठी, अर्थार्जनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलना करिता स्थानीय लोक सरसावले होते.
वन हक्क ग्रामसभा परसोडी, परसोडी रैयतच्या सरपंच रंजना वाडगुरे, वनहक्क समिती  अध्यक्ष दिगंबर मडावी  यांनी, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्काचे मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारित नियम 2012 अन्वये वन हक्क व्यवस्थापन समिती अंतर्गत ग्रामसभा अस्तित्वात आली आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम यंदा  ग्रामसभा परसोडी ला देण्यात आले आहे.  वन हक्क अधिनियम 2006 मधील नियम 2 (घ) नुसार वनभूमी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वनक्षेत्रात कोणत्याही वर्णनाची जमीन,ज्यात वर्गीकरण न केलेले वने, सीमांकित न केलेले वने, मानवी वने संरक्षित वने,राखीव वने, अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान या सर्वांचा समावेश होतो. सर्व प्रकारच्या वनात आमचा वावर होतो.हे अधिकार  ग्रामसभेला आहे,असे सांगितले आहे.
वन हक्क कायदा 2006 नुसार नियम 2008 व सुधारित 2012 अन्वये कलम 3 (1) ग नुसार गावाच्या सीमेवर अंतर्गत व बाहेर (पारंपारिक क्षेत्र) पारंपारिक रित्या गोळा केले जाणारे गौण वन उपज मोहफुले, तेंदूपत्ता इत्यादी चा वापर करणे, गोळा करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे (विक्री किंवा वापर करणे, या साठी स्वामित्व( मालकी) हक्क वन हक्क कायदा 2006 कायद्याच्या तरतुदीनुसार प्राप्त सामूहिक वन हक्क क्षेत्रातूनच नाही तर, संपूर्ण पारंपारिक वापरातील वनातून गौण वनोपज गोळा करण्याचा हक्क मिळाल्याचा दावा वन हक्क समिती ग्रामसभेचे  सचिव पुना वाडगुरे, दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरीचे एनजीओ लांजेवार यांनी सांगितले आहे.
तर व्याघ्र संरक्षण प्रकल्प च्या राखीव वनात तेंदूपत्ता संकलन नियमाप्रमाणे करता येत नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या क्षेत्रातून तेंदुपत्ता संकलनाचे परवानगी गावकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे सीमेत नियमानुसार गावकऱ्यांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मुभा नाही. सचिन डोंगरवार वनक्षेत्र अधिकारी वन्यजीव संरक्षण विभाग( राष्ट्रीय उद्यान) नवेगावबांध. अशी भूमिका वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे .गावकरी सामूहिक तेंदूपत्ता संकलना साठी व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेत गेले असता,त्याला व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी तेंदुपत्ता संकलनाला मज्जाव केला व काही तेंदूपत्ता संकलन करत असणाऱ्या स्त्रियांचे कपडे फाडल्याचे, वन कर्मचाऱ्याकडून अर्वाच्च शिवीगाळ केल्याचे व त्यांच्यावर कुऱ्हाड मारण्यासाठी उगारल्याचे आरोप परसोडी रैयत,पांढरवानी येथील तेंदूपत्ता संकलन साठी गेलेल्या सुकला टेंभुर्णे, संगीता आदे, जिजाबाई मांदाळे, सविता कावळे,रेवता मोहुरले या महिलांनी व इतर उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले. परंतु गावकऱ्यांचे  आरोप फेटाळत,असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे, वनक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी सांगितले. आम्ही तर सकाळपासूनच चर्चा व शांततेने व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचा राखीव जंगलातून तेंदूपत्ता संकलन आपल्याला करता येणार नाही.असेच शांततेने व संयमाने सांगत आहोत. असेही पुढे डोंगरवार म्हणाले. वन हक्क व्यवस्थापन ग्रामसभे चे सदस्य असलेले सर्व परसोडी रैयत, पांढरवाणी,  येथील ग्रामस्थ वन हक्क अधिनियम 2006 त्यात तरतुदी पुढे करून आम्हाला व्याघ्रप्रकल्पाच्या राखीव जंगलातून तेंदूपत्ता गोळा करू द्यावे.  नियमाप्रमाणे गोळा करता येत नाही येत असे म्हणता तर तसा आदेश दाखवावे, असे संतप्त गावकरी वनक्षेत्र अधिकाऱ्यांना मागणी करीत होते. वृत्त लिहीपर्यंत परसोडी पांढरवाणी येथील ग्रामस्थ राखीव जंगलातून तेंदूपत्ता संकलन करू द्या, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. अशी मागणी करून व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या सीमेवरर ठिय्या आंदोलन करीत होते. पोलिस विभागाचे अधिकारी व वनक्षेत्र अधिकारी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत होते. जिल्हाधिकारी गोंदिया, लोकप्रतिनिधी,वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी आता हा प्रश्न कसा सोडवतात? याकडे आंदोलनकर्त्यांचे व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.