चंद्रपूर येथे होणार तिसरे फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२२

चंद्रपूर येथे होणार तिसरे फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन

संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा सबाने
 स्वागताक्षपदी डॉ ऍड अंजली साळवे
चंद्रपूर:
 फुले शाहू आंबेडकर महिला साहित्य व संस्कृती संवर्धन समिती नागपूर व्दारे आयोजित तिस-या फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यीका, प्रकाशक, संपादिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांची तर तर स्वागताध्यक्षपदी महिला व बालकल्याण क्षेत्रातील प्रसिद्ध विधितज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या,वक्त्या, बहुजननेत्या व ओबीसी जनगणना लढ्यातील सर्व परिचित ‘पाटी लावा’ अभियानाच्या प्रणेत्या व संयोजिका डॉ ऍड अंजली साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

स्मृतिशेष डॉ ऍड एकनाथ साळवे साहित्य नगरी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे दि. 8 मे 2022 रोजी आयोजित होणा-या या एक दिवसीय संमेलनात ओबीसी महिलांचे सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वास्तव या संदर्भात तिची भूमिका, भविष्यातील वाटचाल यावर मंथन करण्यात येणार आहे.

महात्मा जोतिबा फ़ुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनशील विचाराने प्रेरीत साहित्यरूपाने अभिव्यक्त होण्यासाठी व नव्या दृष्टीने उभे राहण्यासाठीच 25 व २६ डिसेंबर. २०१९ ला ओबीसी महिलांचे नवविचारांचे फुले, शाहू, आंबेडकर पहिले साहित्य संमेलनाचा पाया नागपूर येथे रचला गेला. कोविड-१९ च्या वातावरणामुळे डिसेंबर२०२० मध्ये दुसरे साहित्य संमेलन ऑनलाईन घेण्यात आले.

ओबीसी महिलांचे सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वास्तव या संदर्भात तिची भूमिका, भविष्यातील वाटचाल यावर सतत मंथन होणे गरजेचे असल्याने पुन्हा एकदा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या परिवर्तनशील विचाराने प्रेरित या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. हे संमेलन म्हणजे ओबीसी महिलांचे वैचारिक क्रांतिकारक पाऊल असल्याचे फुले शाहू आंबेडकर महिला साहित्य व संस्कृती संवर्धन समितीच्या मुख्य प्रवर्तक प्रा. संध्या राजूरकर आणि संयोजक प्रा. माधुरी गायधनी, डॉ वीणा राऊत ,माधुरी लोखंडे यांनी कळविले आहे.