बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी; श्रेयासाठी दोन्ही आमदाराचे दावे - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, मे २६, २०२२

बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी; श्रेयासाठी दोन्ही आमदाराचे दावेआ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित

विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुर शहरातील बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपुर शहरातील बाबुपेठ परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळयाच्या या रेल्वे उडाणपुलासाठी निधी मंजूर झाल्याने बांधकाम प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने दि. २६ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार 5.26 कोटी रु. निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

या रेल्वे उडाणपुलासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे .अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात देखील त्यांनी यासाठी निधी मंजूर करविला.चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील बाबुपेठ रेल्वे उडडाणपुलाचे बांधकाम करण्‍याकरिता प्रशासकीय मान्‍यतेनुसार रेल्‍वेने वहन विभागाकडून रू. १६.३१ कोटी व चंद्रपूर महानगरपालिकेने रू.५.०० कोटी तसेच महाराष्‍ट्र शासनाकडून रू.४०.२६ कोटी असे एकूण ६१.५७ कोटी रूपयांचे बांधकामास शासनाने १५ फेब्रुवारी २०१६ अन्‍वये मंजूरी दिलेली आहे.

सन 2018 -19 मध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निधी जमा केला होता.जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर निधी दिला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा असलेला निधी आ. मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांना सांगून द्याव्यास लावला आहे.नगरविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०१९ नुसार ६७ कोटी रूपयांपैकी अखर्चित निधी फक्‍त २४ कोटी रूपये अद्यापही शिल्‍लक आहेत. त्‍यापैकी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाकडून दिनांक १७.१.२०२२ रोजी एकूण ८ कामांकरिता रू. १८ कोटी ७४ लक्ष निधी मंजूरी करिता तांत्रीक मान्‍यतेसह जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक १८.१.२०२२ च्‍या पत्रान्‍वये नगरविकास विभागाला प्रस्‍ताव सादर केलला आहे. त्‍यामुळे बाबुपेठ उडडाणपुलाच्‍या बांधकामाकरिता उर्वरित शिल्‍लक राहिलेला सन २०१८-१९ चा निधी रू. ५ कोटी २६ लक्ष निधी त्‍वरीत उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक आहे. या बाबीकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव यांचे सातत्याने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लक्ष वेधले . या संदर्भात नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधी उपलब्ध करण्याबाबत विनंती देखील केली . आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
.....

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या नंतर बाबुपेठ उड्डाण पुलासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजुर.

बाबुपेठ येथील उड्डाणपुलासाठी उर्वरित 5 कोटी 26 लक्ष रुपयांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मागच्या आठवड्यातही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे नगरविकास मंत्री यांची भेट घेत सदर मागणी मागणीबाबत चर्चा केली होती. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन बाबुपेठ उड्डाणपुलासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे.

बाबुपेठ येथे उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी अशी येथील नागरिकांची जुनी मागणी होती. अनेक आंदोलनानंतर सदर उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात झाली. मात्र मागील अडिच वर्षापासुन सदर पुलाचा उर्वरित 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी प्रलंबीत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची गती स्थिरावली होती. त्यामुळे सदर उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी २०१९, २०२० आणि २ एप्रिल २०२१ ला पाठवलेल्या पत्रातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानंतर सदर मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावा सुरु होता. यानंतर अनेकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदर मागणीबाबत वारंवार अवगत केले होते. बाबुपेठच्या उड्डाणपुलाचे बांधकामात निधी अभावी रखडल्याने याचा मोठा त्रासही येथील नागरिकांना होत होता. त्यामुळे मागच्या आठवड्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सदर निधीला तात्काळ प्रशासकिय मान्यता प्रधान करण्याची मागणी केली होती. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत सदर निधीला प्रशासकिय मान्यता देण्याचे निर्देश दिले होते. अखेर आज सदर निधीला नगरविकास विभागाच्या वतिने मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता बाबुपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामाला गती प्राप्त होणार आहे. सदर निधीला प्रशासकिय मान्यता दिल्या बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. सोबतच सदर पुलासाठी मनपा प्रशासनाने द्यायचा असलेला पाच कोटी रुपयांचा निधीही मनपा प्रशासनाने लवकर द्यावा यासाठीही आपले प्रयत्न सुरु असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.