१५ एप्रिल २०२२
'संवेदनछावणी' हे कार्यकर्त्यांना बळ देणारे आत्मचरित्र : खा. शरद पवार
"दिलीप पनकुले यांनी 'संवेदनछावणी' या आत्मचरित्रात त्यांच्या संघर्षमय जीवनाचा जळता पट साकार केला आहे. दिलीप पनकुले हा माझा कार्यकर्ता आहे. जवळजवळ पस्तीस-चाळीस वर्षांपासून तो माझ्या संपर्कात आहे. त्यामुळे त्याच्या संघर्षशीलतेची मला जाण आहे. वाट्याला आलेल्या गरिबीने कैकदा तो हतबल झाला, परंतु तरीही त्याची पक्षनिष्ठा डळमळीत झाली नाही. त्यामुळे हे आत्मचरित्र सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरेल," असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने आयोजिलेल्या प्रकाशनसमारंभात खा. पवार साहेबांच्या हस्ते झालेल्या या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, कामगार नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रंथाच्या बाह्यांगासंबंधी बोलताना पवार साहेब पुढे म्हणाले, "गोर बंजारा प्रकाशनाने माझ्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या संवेदना जाणून घेतल्या आणि त्या अत्यंत दर्जेदारपणे प्रकाशित केल्या. प्रकाशक मनोहर चव्हाण, मुखपृष्ठकार जयंत आष्टनकर, सौरभ प्रिंटींग प्रेसने केलेली सुबक अक्षरजुळवणी आणि ब्लर्बलेखक डॉ. प्रकाश राठोड या सर्वच मंडळींनी या आत्मचरित्राला साकार करण्यात फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत," या शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना 'संवेदनछावणी'कार दिलीप पनकुले म्हणाले, "अनेक वर्षांपासून माझे जगणे मी शब्दांच्या स्वाधीन करावे, असा विचार मनात घोळत होता. परंतु लेखन ही साधना असते. त्या साधनेसाठी लागणारा निवांत वेळच मला मिळत नव्हता. पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहेच. इतरही अनेक कामे होतीच. परंतु कोवीड काळात लॉकडाऊन सुरू झाले. त्या काळात मृत्यूची भीषण रूपे मी पाहत होतो. त्या भयाण दहशतीच्या वातावरणात मी स्वतःला गृहबंदी करून घेतली आणि त्याच तंद्रीत 'संवेदनछावणी' मी लिहून काढली. माझ्या आत्मचरित्राची समीक्षा अभ्यासक करतीलच, परंतु हे आत्मचरित्र लिहून अपार कृतज्ञतेचे क्षण मी अनुभवत आहे," असे भावोत्कट उद्गार त्यांनी काढले.
या प्रकाशनसोहळ्याला उपस्थित असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि साहित्यक्षेत्रातील जाणकार आस्वादक मंडळींनी लेखक दिलीप पनकुले यांचे अभिनंदन करून त्यांना सदिच्छा दिल्या.
'Sensation Chhavani' is a workman's self-character: eat. Sharad Pawar
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
