नवेगावबांध येथे दोन दिवसीय बैलगाडा शर्यतीत तुफान गर्दी. सहा वर्षानंतर उडाला बैलगाड्याच्या शर्यतीचा धुरळा. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, एप्रिल १९, २०२२

नवेगावबांध येथे दोन दिवसीय बैलगाडा शर्यतीत तुफान गर्दी. सहा वर्षानंतर उडाला बैलगाड्याच्या शर्यतीचा धुरळा.

108 बैलजोडयांचा सहभाग,करडी येथील निशिकांत इलमे अव्वल.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.19 एप्रिल:-
येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन नवेगाव बांध येथील बैलगाडा शर्यत समिती द्वारा आयोजित दि.१६  व १७ एप्रिल ला बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
पटाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांच्या हस्ते झेंडा पूजन करून करण्यात आले. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, नवल चांडक,परेश उजवणे,जितेंद्र कापगते, खुशाल काशिवार,मूलचंद गुप्ता, जगदीश पवार,कमल जयस्वाल,विलास कापगते उपस्थित होते.
या शर्यती करिता १०८ बैलजोड्यांनी बैलगाडा शर्यतीत भाग घेतला. नवेगावबांध याठिकाणी दरवर्षी संक्राती मध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरविला जात होती. काही दिवसानंतर या ठिकाणी पटाची जागा इतर शासकीय कार्यालया साठी देण्यात आल्याने व काही जागेवर अतिक्रमण झाल्याने पट भरविणे संपुष्टात आले होते. नंतर पुन्हा या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. परंतु उच्च न्यायालयाच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी नुसार हे सर्व बंद झाले होते. पुन्हा एकदा यावरील बंदी उठविल्यानंतर नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षानंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा शनिवार रविवारला उडाला.येथील व परिसरातील लोकांमध्ये व पट शौकिनां मध्ये आनंदाचे वातावरण होते. स्थानिक व पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध,महिला पुरुषांनी शर्यतीचा मनसोक्त आनंद लुटला.
भंडारा जिल्ह्यातील करडी येथील निशिकांत इलमे यांनी प्रथम क्रमांक २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले, खांबा येथील राजकुमार राणे यांनी १५ हजार रुपयाचे द्वितीय रोख बक्षीस, तर मध्यप्रदेशातील बालाघाट येथील नीलू भोला यांनी ११ हजार रुपयाचे रोख तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश,तीन राज्यातील,तसेच
 विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती  या तीन राज्यातील १०८ बैल जोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. ४५ सेकंदाच्या आत आलेल्या ८६ जोड्या अंतिम फेरीत उतरल्या. त्यापैकी सात बैल जोडयांना रोख पारितोषिके देण्यात आली रविवार ला रात्री ७.०० वाजता विजेत्या बैल जोडयांना उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवल चांडक विलास कापगते जगदीश पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. टिकाराम संग्रामे,जगदीश पवार, खुशाल काशीवार, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, नंदागवळी यांनी निर्णायक मंडळाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन करून, उपस्थितांचे आभार सतीश कोसरकर यांनी मानले
शनिवारी रात्रीला वंदेमातरम या नाटकाचा प्रयोग रसिकांच्या सेवेत सादर करण्यात आला. या शर्यतीच्या आयोजनामुळे गावात व परिसरातील पट शौकिनांच्या आनंदाला पारावर उरला नाही.