धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विषयांपासून बहुजन समाजातील तरुणांनी दूर राहावे | डॉ राकेश गावतुरे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० एप्रिल २०२२

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विषयांपासून बहुजन समाजातील तरुणांनी दूर राहावे | डॉ राकेश गावतुरे
 सामाजिक कार्यकर्ते डॉ राकेश गावतुरे यांचे आवाहन


राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून धार्मिक तेढ निर्माण केले जात आहेत. हे समाजाच्या भल्यासाठी नाही. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. त्याचा कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बहुजन समाजातील मुलांनी अशा आसामाजिक कार्यात सामील होऊ नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले आहे.


आज 30 एप्रिल रोजी त्यांनी हॉटेल एन डी येथे पत्रकार परिषद घेतली. यात शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ते म्हणाले की समाजातील तरुणांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, महागाई या समस्या भेडसावत आहेत, त्या दूर करण्याची आज खरी गरज आहे. मात्र राजकीय पक्ष आणि सत्ताधारी त्यावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तरुण पिढी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या या आमिषाला बळी पडून चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना भोंगे या विषयावर चर्चा केली जात आहे. मात्र राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राजकारण्यांकडून केले जात असलेले हे प्रयत्न आता थांबले पाहिजेत. राजकीय पक्षांकडून निवडून येण्यासाठी तरुणांकडून मते मागितली जातात. मात्र त्यांच्या प्रश्नावर काहीच कोणी बोलत नाही. लोकांच्या मूलभूत प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष देण्याची मागणी देखील गावतुरे यांनी केली.