दिव्यांगांनची आरोग्य व सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक.अर्जुनीमोरगाव दिव्यांग शिबिरातील प्रकार. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ एप्रिल २०२२

दिव्यांगांनची आरोग्य व सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक.अर्जुनीमोरगाव दिव्यांग शिबिरातील प्रकार.


असले प्रकार भविष्यात खपवून घेतले जाणार नाही:- रचना गहाणे
शेकडो दिव्यांगांची घोर निराशा,भर उन्हात झाले हाल.संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.११ एप्रिल:-
सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभाग यांच्या वतीने आज 11 एप्रिल रोज सोमवारला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर भरविण्यात आले होते मात्र नव्याने प्रमाणपत्र देण्याची कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नव्हती. त्यामुळे दिव्यांग आहेत, पण प्रमाणपत्र नाही. अशा तालुक्यातील विद्यार्थी, युवक, युवती,आबालवृद्ध यांच्यासह शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांची घोर निराश होऊन रिकाम्या हाताने त्यांना घरी परतावे लागले. त्यामुळे या सावळागोंधळाला कारणीभूत कोण? चुकीची माहिती तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने का देण्यात आली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया व आरोग्य विभाग त्यांच्या संयुक्त विद्यमाने स्वावलंबन पोर्टल मार्फत संगणकीय दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) वाटप करण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत अर्जुनी-मोर येथील ग्रामीण रुग्णालयात आज ११ एप्रिलला विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते .
तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी-मोर चे नावाने सामाज माध्यमावर नवीन दिव्यांग प्रमाणपत्र बनवून मिळतील. असा संदेश टाकण्यात आला होता. आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांना गावातील दिव्यांगांना शिबिरात पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक समाज माध्यमावर ही पोस्ट सतत ८ एप्रिल पासून फिरत आहे. आज मात्र वेडी शिबिरात भलतेच घडले या शिबिरात एकच सावळागोंधळ उभा झाला.. ज्या दिव्यांगाची जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपली होती, ती वाढवून देणे व ऑनलाइन नोंदणी केलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे हा या शिबिराचा उद्देश आहे.असे ऐन वेळी सामाजिक न्याय व आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्र आज मिळणार या आशेने तालुक्‍यातील शेकडो दिव्यांगजनांनी अर्जुनी मोरगाव च्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली .मात्र प्रत्यक्षात नवीन कार्ड तयार करण्याची कसलीही यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे, उपस्थित झालेल्या दिव्यांगांना कमालीचा त्रास सोसावा लागला. यामुळे आयोजकांची तारांबळ तर उडालीच मात्र दिव्यांगजणांना झालेला त्रास पाहू जाता शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने दिव्यांगजनांसोबत व्यवहार करीत आहे. याचं उदाहरण यानिमित्ताने पाहण्यास मिळाले. यातून सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभाग यांच्यात कसलाही समन्वय नव्हता हे या निमित्ताने उघडकीस आले आहे. विद्यार्थी, युवक,युवती, दिव्यांग आहेत पण प्रमाणपत्र नाही अशा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती मात्र त्यांना निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
सदर हलगर्जीपणा जी. प. सदस्य तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना ताई गहाणे यांना कळताच त्या ग्रामीण रुग्णालयात पोचल्या व आयोजकांना चांगलेच झापले .शासकिय यंत्रने मार्फत लोकप्रतिनिधींना कशा पद्धतीचे वर्तन करावे याची जाणीवसुद्धा नसल्याचे दिसून आले. या सर्व प्रकाराने संतापलेल्या रचना ताईंनी याप्रसंगी संबंधित यंत्रनेचा खरपूस समाचार घेतला व आयोजक यंत्रनेचा जाहीर निषेध करून,भविष्यात असेच प्रकार घडल्यास यंत्रणेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.भविष्यात असेच प्रकार घडल्यास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना खोलीत डांबून ठेवण्याची धमकी दिली. यानंतर समाज कल्याण अधिकारी गोंदिया यांनी आपल्या भाषणातून झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला . मात्र म्हणतात ना की बूँद से गयी वो हौद से नही आती. सदर प्रकरणातून समाज कल्याण विभाग व आरोग्य विभाग काय सुधारणा करतो हे भविष्यात दिसून येईलच.