ग्रामीण युवकांनी बोली संवर्धनाचे कार्य करावे - डॉ. मनोहर नरांजे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मार्च २०२२

ग्रामीण युवकांनी बोली संवर्धनाचे कार्य करावे - डॉ. मनोहर नरांजे



     
मराठी भाषेचे सौंदर्य भाषेत बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींमुळे टिकून आहे. या बोलींच्या संवर्धनासाठी ग्रामीण युवकांनी पुढाकार घ्यावा ,असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक व पुरातत्तव संशोधक डॉ. मनोहर नरांजे यांनी केले.
       येथील श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात  मराठी भाषा गौरव दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 'बोली आणि मराठी भाषा ' या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप रणदिवे होते.
        डॉ. नरांजे पुढे म्हणाले , मराठीचा प्रवाह समृद्ध करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतील बोलींचे जतन झाले पाहिजे , त्यासाठी ग्रामीण युवकांनी पुढे यावे ;  तरच मराठी भाषा कायम टिकून राहील. महाविद्यालयाच्या मराठी , इंग्रजी आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या पालखीच्या मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांचे अभिवाचन करून मराठी भाषेचा जागर केला. 
      डॉ. मनोहर नरांजे यांची २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानिमित्त त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. 
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. तीर्थराज कापगते यांनी केले.  संचालन प्रा. सुनील अलोणे यांनी केले तर आभार डॉ. दिलीप गंथाळे यांनी मानले.  नुकतेच मराठीची नेट परीक्षा पास केल्याबद्दल प्रा. गणपत भुजाडे यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.     
       कार्यक्रमाला श्री. शरद शहारे, प्रा. सुरेश नखाते डॉ. अविनाश तितरमारे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.