राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार | पाच आरोपींना मुद्देमालासह अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मार्च २०२२

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार | पाच आरोपींना मुद्देमालासह अटकसर्व आरोपींना 9 मार्चपर्यंत वनकोठडी.


संजीव बडोले / जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.७ मार्च:- नवेगाव बांध वनपरिक्षेत्र अंतर्गत बोरटेकडी सहवन क्षेत्रातील सुरतोली बिट १ मधील कक्ष क्रमांक ७३१ संरक्षित वनांमध्ये ६ मार्च रोजी वनरक्षक गस्त करीत असताना इटीयाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे अवैधरीत्या शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आज ७ मार्च रोज सोमवार ला सकाळी ९.०० वाजता  येरंडी दर्रे येथील ४ व केशोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या परसटोला येथील १ असे एकूण पाच आरोपींना वन विभागाच्या वतीने अटक करण्यात आले आहे. चिंतामण सुकलू भोगारे (वय ६५ वर्षे), मेहतलाल चिंतामण भोगारे(२५ वर्षे), दौलत हिरामण सलामे(४५वर्षे), इंदल काशीराम सलामे (४७ वर्षे) सर्व राहणार येरंडी दर्रे, सकेश्वर लहू मडावी (४०वर्षे) राहणार परसटोला हे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सूरतोलीचे बीट वनरक्षक एस.यु.धनस्कर दिनांक ६ मार्च रोज रविवार ला गस्त घालत असताना,तीन व्यक्ती संशयित रित्या फिरताना आढळले तेव्हा त्यांना अडवून त्यांची चौकशी केली असता, रासायनिक खताच्या पिशवी पासून बनवलेल्या पिशवीत पाहिले, तर एक गळा कापलेला राष्ट्रीय पक्षी असलेला मोर मृतावस्थेत आढळून आला. त्याच पिशवीत वाघ बिबट यांच्या शिकारी साठी वापरला जाणारा एक स्प्रिंग आढळून आला. वन परिक्षेत्र कार्यालय नवेगावबांध येथे या शिकारी बाबतची बिटवनरक्षक सुरतोली एस. यु. धनस्कर यांनी फिर्याद नोंदवली आहे.पंचा समक्ष पंचनामा करून आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

लोखंडी स्प्रिंग व सापळा मौजा येरंडी दर्रे येथील दौलत सलामे याच्याकडून आणण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. इटियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या एका नाल्यात मोराची शिकार केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. आरोपींकडून मृतावस्थेतील वन्यजीव मोर, लोखंडी सापळा, वाघ, बिबट्याच्या शिकारीसाठी उपयोगात आणला जाणारा लोखंडी स्प्रिंग आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. पाचही आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात दहा मार्च पर्यंत पुढील चौकशी करिता, वन कोठडी मागण्यात आली होती.सर्व आरोपींना ९ मार्चपर्यंत वन कोठडी न्यायालयाने मंजूर केली आहे.     सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध   दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, नवेगावबांध वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे या प्रकरणाची पुढील चौकशी करीत आहेत.