चंद्रपूर,भाजपला धक्का:भिवापूर वार्डातील भाजपच्या दोन्ही नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मार्च २०२२

चंद्रपूर,भाजपला धक्का:भिवापूर वार्डातील भाजपच्या दोन्ही नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चंद्रपूर:
देशाचे माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे माजी वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अतिशय निकट असलेले व भाजपच्या तिकिटावर तब्बल चार टर्म म्हणजेच 20 वर्ष निवडून आलेले चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्ड येथील नगरसेवक वसंत देशमुख यांच्यासह अन्य एक नगरसेवक प्रशांत घोनमोडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या या प्रवेशाने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून त्याची जय्यत तयारी व मोर्चेबांधणी सुरू झाली असली तरी मात्र देशमुखांच्या या धक्क्याने महानगरपालिका व वार्डात चांगलीच चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीने केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांवर अन्याय केला. काँग्रेस पक्ष मनाने आणि विचाराने मोठा आहे. म्हणून मी माझ्या सहकार्यासोबत काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे पक्ष प्रवेशाचा प्रसंगी देशमुख म्हणाले.

मागील अनेक दिवसापासून देशमुख हे भाजपमध्ये नाराज होते.पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. वसंत देशमुख यांना वर्षभरापूर्वी स्थायी समिती सभापतीपद नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी उघड भाजप विरोधी भूमिका घेत पक्षश्रेष्टींवर सातत्याने टीका केली होती.

आता येणाऱ्या निवडणुकीत भिवापूर वार्डातील या  प्रभागात भाजपकडून कोणता उमेदवार टाकण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.