ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील टी -161 या वाघाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० मार्च २०२२

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील टी -161 या वाघाचा मृत्यू

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे 4.5 वर्षे वयाचा T 161 हा नर वाघ दि . 30 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजता आंबेउतारा नियतक्षेत्र , रानतळोधी  कारवा रेंजमधील वनखंड क्रमांक 290 मधील आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळून आला .


एप्रिल 2019 मध्ये T19 या वाघिणीच्या 1 नर व 2 मादी अशा तीनही बच्चांना रेडिओ कॉलर लावण्यात आली होती . रेडिओ कॉलरचा शेवटचा सिग्नल ऑगस्ट 2019 मध्ये प्राप्त झाला होता , त्यानंतर 2020 आणि 2021 मध्ये T 161 हा नर वाघ व्यवस्थितपणे फ़िरत असल्याचं कॅमेरा ट्रॅपमुळे लक्षात आले . मात्र तांत्रिक दोषामुळे त्याची रेडिओ कॉलर काढून टाकता आली नाही . म्हणून 2019 मध्ये कॉलर काढण्यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यात यश आले नाही . त्यानंतर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये अधून - मधून या वाघाचे फोटो मिळत होते व वाघाचे आरोग्य उत्तम दिसून येत होते . मात्र फेब्रुवारी 2022 मध्ये मिळालेल्या छायाचित्रात या वाघाच्या गळ्याभोवती जखम दिसून आली . म्हणून कॉलर काढण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले गेले . परंतु घनदाट जंगलात तो सतत फ़िरत असल्यामुळं ते प्रयत्न अयशस्वी झाले . 29 मार्च रोजीही आंबेउतारा ओढ्याजवळ हा वाघ दिसला होता , मात्र त्याला पकडता आले नाही . दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता शोधकार्यात असणा - या पथकाला नाल्यात वाघाचा मृतदेह आढळला . शव विच्छेदनाकरीता त्याला चंद्रपूर येथील तात्पुरत्या उपचार केंद्रात नेण्यात आले . डॉ . एकता शेडमाके ( प.वि.अ. चंद्रपूर ) , , डॉ . राहुल शेंद्रे ( प.वि.अ. वरोरा ) , डॉ . कुंदन पोडचेलवार ( पशुवैद्य , ता.अं.व्या.प्र . ) यांनी शवविच्चेदन केले . यावेळी डॉ . जितेंद्र रामगावकर ( क्षेत्र संचालक , ता.अं.व्या.प्र . ) , श्री . नंदकिशोर काळे ( उ . सं . कोर विभाग ) , श्री . महेश खोरे ( स.व.सं. ) , श्रीमती . कृष्णापूरकर ( वपअ , कारवा ) श्री . रामटेके ( वपअ , कोळसा ) हे उपस्थित होते . याबरोबरच प्रधान मुख्य वनसंरक्षक ( व.जी. ) यांचे प्रतिनिधी म्हणून श्री . बंडू धोत्रे व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून श्री . मुकेश भांदककर हेही शवविच्छेदनाच्या वेळी उपस्थित होते . शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे रक्तदोष उद्भवला . वाघाचे अंतर्गत अवयव पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे .


Tadoba - Tiger T-161 from the Dark Tiger Project dies