टाटा ट्रस्टने चंद्रपूर येथे कॅन्सर रुग्णांसाठी सुरू केली मोफत डे केअर केमोथेरपी सेवा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, फेब्रुवारी ०७, २०२२

टाटा ट्रस्टने चंद्रपूर येथे कॅन्सर रुग्णांसाठी सुरू केली मोफत डे केअर केमोथेरपी सेवा


टाटा ट्रस्टने चंद्रपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (जीएमसी) मधील कॅन्सर रुग्णांसाठी सुरू केली मोफत डे केअर केमोथेरपी सेवा                                
• या सेवांमुळे कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांवरील आर्थिक भार कमी होणार 


• विदर्भातील रुग्णांना केमोथेरपीसाठी दूरवर प्रवास करावा लागणार नाही


चंद्रपूर : जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने जनरल मेडिकल कॉलेज (जीएमसी) चंद्रपूर येथील कॅन्सर रुग्णांसाठी डे केअर केमोथेरपी सेवेस सुरुवात केल्याची घोषणा टाटा ट्रस्टने आज केली. ही केमोथोरपी सत्रे आणि संबंधित सेवा चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन (सीसीसीएफ)च्या सक्षम वैद्यकीय पथकाद्वारे विनामूल्य पुरवली जाणार आहेत. सीसीसीएफ हे टाटा ट्रस्ट्स आणि महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाय (डीएमईआर) आणि डिस्ट्रिक्ट मिनेरल फाउंडेशन (डीएमएफ) यांनी कॅन्सर रुग्णांना त्यांच्या घराच्या जवळ परवडणा-या दरांत दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी स्थापन केलेले एक स्पेशल पर्पज व्हेइकल अर्थात विशिष्ट हेतूसाठी समर्पित उपसंस्था आहे.
या सेवेचे उद्घाटन चंद्रपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीम. विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला चंद्रपूरचे सिव्हिल सर्जन डॉ.एन.बी.राठोड,जीएमसीचे डीन डॉ. अशोक नितनवरे, डॉ.मंगेश गुलवाडे, अध्यक्ष,आयएमए चंद्रपूर आणि टाटा ट्रस्ट्स कॅन्सर केअर प्रोग्रामच्या अकॅडमिक्स विभागाचे प्रमुख (क्लिनिकल प्रशिक्षण – शिक्षण व मानव संसाधन) डॉ. कैलाश शर्मा यांच्यासह जीएमसी चंद्रपूर आणि टाटा ट्रस्ट कॅन्सर केअर प्रोग्रामच्या सदस्यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. कॅन्सरच्या अनेक प्रकारांमध्ये केमोथेरपी हा उपचारांचा मुख्य भाग असतो. शस्त्रक्रिया किंवा रेडिओथेरपीनंतर कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करण्यासाठी केमोथेरपीचा सल्ला रुग्णांना दिला जातो. कर्कपेशींच्या ट्यूमरचा आकार कमी करण्यासाठी आणि त्याचा भाग मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेच्या आधीही ती करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. मात्र कॅन्सरचा प्रकार आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे यानुसार या उपचारपद्धतीसाठी ३ ते ६ महिने इतका दीर्घ कालावधी लागू शकतो, ती अनेकदा घ्यावी लागू शकते आणि त्यासाठी वारंवार हॉस्पिटलला भेट द्यावी लागते. 


“विदर्भ हा कॅन्सरचे रुग्ण सर्वाधिक संख्येने आढळणारा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा प्रांत आहे. राज्यामध्ये प्रत्येक १० पुरुषांमागे एकाला आणि प्रत्येक ११ स्त्रियांमागे एका स्त्रीला कॅन्सर होण्याचा धोका असतो. कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारांसाठी वारंवार दूर दूर पर्यंत प्रवास करावा लागतो. कॅन्सरवर उपचार करणा-या हॉस्पिटल्सच्या या फे-यांपैकी सर्वाधिक फे-या या केमोथेरपीसाठी असतात. चंद्रपूरच्या जीएमसी येथे मोफत केमोथेरपी सेवा उपलब्ध झाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांवरील आर्थिक भार कमी होईलच पण त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी करावा लागणारा प्रवास, खाण्यापिण्याची- राहण्याची व्यवस्था, कामावरून सतत गैरहजर राहिल्याने कापला जाणारा पगार या सगळ्यामुळे त्यांचा मनावर येणारा ताण आणि वाटणारी चिंता कमी होण्यासही मदत होईल.“ माननीय  श्रीमती. विद्युत वरखेडकर, अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर, उद्घाटन समारंभात उद्घाटन सोहळ्याच्या वेळी म्हणाले. 


विदर्भामध्ये दर एक लाख रुग्णांपैकी ऐंशी रुग्ण हे कॅन्सरचे असल्याने या भागावर कॅन्सरचा मोठा भार आहे. येथे स्त्रियांमध्ये स्तन, गर्भाशयमुख (सर्व्हिक्स) आणि आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात आढळते तर पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंडाची पोकळी आणि अन्ननलिकेचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात आढळतो. या वाढत्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी बहुविध उपचारधोरणांची गरज आहे. 


“टाटा ट्रस्टच्या कॅन्सर केअर प्रोग्राममध्ये आम्ही ही समस्या सोडविण्यासाठी सीसीसीएफच्या माध्यमातून अनेक आघाड्यांवर काम करत आहोत. कर्करोगाच्या सहज ओळखता येण्याजोग्या प्रकारांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि कॅन्सरच्या स्क्रिनिंगसाठी पीएचसी व एचडब्यू्रक सी कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी आमचे सार्वजनिक आरोग्य पथक ब्लॉक आणि पंचायत पातळीवर काम करत आहे. तोंडाचा, स्तनांचा आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग तसेच इतर असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी जीएमसी चंद्रपूर येथे आम्ही ‘स्वस्थ चंद्रपूर’ हे स्क्रीनिंग किऑस्क बसविले आहे. आज सुरू करण्यात आलेल्या डे केअर केमोथेरपी सेवेबरोबरच आम्ही चंद्रपूरमध्ये संयुक्तपणे एक अद्ययावत कॅन्सर केअर हॉस्पिटलची स्थापनाही करत आहोत जिथे या भागातील व आसपासच्या परिसरातील कॅन्सर रुग्णांना त्यांच्या घराजवळ, परवडणा-या दरात दर्जेदार सेवा मिळू शकेल.”  टाटा ट्रस्ट्स कॅन्सर केअर प्रोग्रामचे चीफ एक्झेक्युटिव्ह डॉ. संजीव चोप्रा म्हणाले. 


“कॅन्सर रुग्णांची देखभाल हे अनेक दशकांपासून टाटा ट्रस्ट्सचा प्राधान्याचे क्षेत्र राहिले आहे. उपचार उपलब्ध न झाल्याने किंवा उपचार परवडले नाहीत म्हणून कोणतीही व्यक्ती कॅन्सरच्या देखभालीपासून वंचित राहू नये याची काळजी घेणे हे या प्रोग्राममध्ये काम करणा-या आम्हा सा-यांचे उद्दीष्ट आहे. कॅन्सर रुग्णांसाठी मोफत केमोथेरपी सेवा सुरू करणे हेसुद्धा कॅन्सर देखभालीच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याशी आणि कॅन्सरवरील उपचार सर्वांना परवडणा-या दरांत सहज उपलब्ध व्हावेत या हेतूशी आपली बांधिलकी जपण्याच्या दिशेने आम्ही उचललेले आणखी एक पाऊल आहे.” टाटा ट्रस्ट्स कॅन्सर केअर प्रोग्रामच्या अकॅडमिक्स विभागाचे (क्लिनिकल ट्रेनिग – एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस) प्रमुख डॉ. कैलाश शर्मा म्हणाले. 
या डे केअर केमोथेरपी सेवेचे व्यवस्थापन प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅलिएटिव्ह केअर वर्कर्सच्या पथकाद्वारे केले जाईल.Tata Trust launches free day care chemotherapy service for cancer patients in Chandrapur