इरई सौंदर्यीकरणाबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार करणार नदीची पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ फेब्रुवारी २०२२

इरई सौंदर्यीकरणाबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार करणार नदीची पाहणीनगरसेवक पप्पू देशमुख यांच्या मागणीनंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांचे आश्वासन

चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गणतंत्र दिनी इरईलगत पात्राचे सौंदर्यीकरण करण्याची तसेच बंधारा बांधण्याची घोषणा केली होती. परंतु इरईच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच नदीचे पात्र उथळ झाल्याने परिसरात नेहमीच पुराचा धोका संभवतो. त्यामुळे बंधारा बांधण्यापूर्वी खोलीकरण करणे गरजेचे आहे, ही बाब नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन लक्षात आणून देत एकदा इरईची प्रत्यक्ष पाहणी करावी व तलावाचे खोलीकरण केल्यानंतरच सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी पप्पू केली. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले.


इरई नदी चंद्रपूरकरांची जीववाहिनी आहे. त्यामुळे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी इरई नदीच्या पात्रालगत सौंदर्यीकरण तसेच नदीपात्रामध्ये बंधारा बांधण्याची घोषणा केली.
मात्र इरई नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेमुळे नदीचे पात्र उथळ झालेले आहे. परिणामी वडगाव, नगीनाबाग,विठ्ठल मंदिर, एकोरी प्रभाग इत्यादी परिसरामध्ये सतत पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बंधारा निर्मिती करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात इरई नदीची स्वच्छता व खोलीकरण करणे गरजेचे आहे.
प्रत्यक्षात नदीची प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय याबाबत चांगल्या पद्धतीचे नियोजन करणे शक्य नाही. त्यामुळे नगरसेवक देशमुख यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच इरई नदीची पाहणी करावी, अशी मागणी केली.


नगरसेवक देशमुख यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी लवकरच नदीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.*जनविकास सेनेतर्फे इरई सौंदर्यीकरणाच्या निर्णयाचे स्वागत*
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी इरई नदीच्या पात्रालगत सौंदर्यीकरण करण्याचा तसेच बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जनविकास सेनेचे संस्थापक नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालकमंत्र्यांच्या या घोषणेचे जनविकास सेनेतर्फे स्वागत केले आहे.