मंगळवार, फेब्रुवारी ०८, २०२२

थकबाकीदारांचे गाळे सील करण्याचे आयुक्तांचे निर्देश

 शास्तीचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ७ दिवस शिल्लक 

चंद्रपूर, ता. ८: चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून ही योजना सुरु असून, १५ फेब्रुवारी रोजी शेवटची मुदत आहे. शेवटचे ७ दिवस शिल्लक असून, शास्तीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान, थकबाकीदारांचे गाळे सील करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. 

राणी हिराई सभागृहात ८ फेब्रुवारी रोजी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर आढावा बैठकीत उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्यासह विभागप्रमुख  अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी सर्व झोननिहाय वसुली पथकाचा आढावा घेतला. वसुलीचे लक्ष्य वाढविण्यासाठी सर्व पथक प्रमुखानी मालमत्ताधारकाशी संपर्क वाढवावा, शास्तीमाफीची माहिती देण्यात यावी, असेही सूचित केले. व्यावसायिक मालमत्ता कर थकीत असलेल्या गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.  


१० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या योजनेस मुदतवाढ देण्यात आली.त्यानुसार १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ ते २८ फेब्रुवारी ७५ टक्के, तर १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार आहे. १०० टक्के लाभ घेण्यासाठी पुढील ७ दिवसात कराचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


पाणीपट्टीचा भरणा त्वरित करा; अन्यथा नळजोडणी बंद होणार

 चंद्रपूर मनपा हद्दीतील पाणीपट्टी वसुली सुरु असून, थकीत भरणा त्वरित न केल्यास नळजोडणी बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी पथकप्रमुखांना दिले. शहरात एकूण ३५ हजार नळधारक आहेत. वसुलीची मोहीम जोमाने राबविण्यात येत असून, थकबाकीदारानी त्वरित भरणा न केल्यास त्यांचे नळजोडणी बंद करण्यात येत आहे. थकीत पाणीपट्टी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १ संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स,  झोन कार्यालय क्रमांक २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणीपट्टी भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.