२५ फेब्रुवारी २०२२
कोरोना संसर्गाच्या सावटाखाली प्रतापगड येथील महाशिवरात्री यात्रा रद्द.भाविकांची निराशा.
नवेगावबांध दि.२५ फेब्रुवारी:-
गोंदिया जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक असलेले अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री साठी भरणार यात्रा गोंदिया जिल्हा प्रशासनाद्वारे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.मागिल दोन वर्षांपासून कोरोनाचे सावटाखाली यात्रा रद्द करण्यात येत आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यांतुन प्रतापगड येथे महाशिवरात्री यात्रेला भाविक भोलेशंकराच्या तसेच ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले सुप्रसिद्ध व ऐतिहासिक वारसा असलेल्या प्रतापगड येथे दरवर्षी सलग पाच दिवस महाशिवरात्री व ख्वाजा उस्मान गणी हारुनी उर्स निमित्त यात्रा भरते. येत्या १ मार्च रोजी महाशिवरात्री आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी असले, तरी यात्रेनिमित्त वाढणाऱ्या गर्दीमुळे कोविड १९ संसर्गाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ शकतो.हे सर्वसामान्य जनता व नागरि कांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते.त्यामुळे महाशिवरात्री निमित्त अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीला भरणारी तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी महाशिवरात्रीला भरणाऱ्या सर्व यात्रा जिल्हाधिकारी गोंदिया नयना गुंडे यांनी आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भ व नजीकच्या राज्यात प्रसिद्ध असलेली प्रतापगड येथील महाशिवरात्री निमित्त भरणा-या यात्रेत छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच विदर्भातील दरवर्षी ४ ते ५ लाख भाविक देवदर्शनाला येतात.भाविक दर्शनासाठी व पोहा, नवस फेडण्यासाठी येतात.दोन किमी.अंतर पायी जाऊन महादेवाचे व ख्वाज उस्मान गणी हारुनी यांचे दर्शन घेतात.पिढ्यानपिढ्या पासून येथे यात्रा भरते.मागिल दोन वर्षांपासून ही परंपरा कोरोनाचे सावटाखाली खंडीत झाली आहे. त्यामुळे भाविकांची फार मोठी निराशा झाली आहे.त्यामुळे यंदा प्रतापगड येथील तसेच जिल्ह्यातील सर्व ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरणार नाही. हे येथे उल्लेखनीय आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
