माय तू ये ना! - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, जानेवारी ०५, २०२२

माय तू ये ना!माय तू ये ना!

तिची कहाणी कानावर पडताच रडू कोसळणारच. ती बोलायची तर तिचे शब्द हृदयाला भिडणारच. तिच्या संघर्षाची व्यथा मांडतांना डोळे पानावणारच आणि आत्मविश्वासही वाढणारच.अनाथांचा विडा उचलणारी माय सिंधुताईच्या निधनाने अनेक जण पोरके झाले आहेत. त्यांच्या कार्याची ज्योत अशीच कायम तेवत ठेवावी, हीच त्यांना श्रद्धांजली असेल.आईचा आधार असला की, सारी संकटे चुटकीसरशी नाहीशी होतात. मुलांसमोरील भल्याभल्या मोठ्या आव्हानांना पेलण्याचे बळ केवळ आईजवळच असते. ती किमया अनाथ मुलांसोबत साधली होती सिंधुताई सपकाळ यांनी. तिच्या निधनाने अश्रूही गहिवरले. किती गुणगान गावे त्या माऊलीचे.ज्यांना आधार नसताना, रस्त्यावर दरदर भटकत असताना, वाट सापडत नसताना हात पुढे करून कवेत घेणारी माय आज आपल्यातून निघून गेली आहे.तिच्या हातांनी अनेकांना गोंजारले. किती जणांचे जगणे सुसह्य करण्यासाठी तिने आटापिटा केल्या. ज्यांना समाज दूर करायचा त्यांना ती माऊली जवळ करायची. त्यांना कुशीत घ्यायची. आज ती आपल्यातून निघून गेली आणि भलंमोठं आधारच कोसळलय. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी ऐकताच अनेक अनाथ, गोरगरीब आणि सर्वच स्तरातील मंडळी हळहळले. "माय तू ये ना परत"अशी हाक देत अनेकांनी हंबरडा फोडला. आता ती कायमची आपल्यातून निघून गेली. सिंधुताईचा जन्म वर्धा येथे झाला. घरात मुलीला विरोध असताना त्यांचा जन्म झाल्याने वाट्याला उपेक्षाच आली. चौथीपर्यंत शिक्षण घेत असतानाच वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न करून देण्यात आलं. स्वतः इतर अनाथ आणि बेवारस मुलांचा सांभाळ करत आधार दिला. या ठिकाणी त्यांनी लहान मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचीही जबाबदारी स्विकारली.तर अनेक अनाथ मुला-मुलींचे लग्न करून दिले. पदराखाली घेऊन अनाथांना मायेची सावली देऊन आयुष्य फुलविण्याचे काम करणाऱ्या सिंधुताईच्या निधनाने कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

-मंगेश दाढे