मूकबधिर विद्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जानेवारी २०२२

मूकबधिर विद्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कारशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
:आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन ही कर्णबधिर मुला- मुलींना शिक्षण देणारी नामांकित शाळा आहे. सन १९८३ पासून सुरू झालेल्या या शाळेत अनेक प्रतिभावंत व गुणवंत शिक्षक कर्मचारी होऊन गेले. त्यांनी अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी सुद्धा घडवले आहेत. या शाळेतून अनेक कर्मचारी आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यापैकी काही शिक्षक कर्मचारी कोरोना प्रादुर्भावाच्या उच्चांक काळात सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला नव्हता.
दि.४ जानेवारी ला नववर्षाच्या पर्वावर व अंधाच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणारे लुईस् ब्रेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले सोपान हंगे, कनिष्ठ लिपिक रमेश क्षीरसागर, शाळा काळजीवाहक हिरामण शेरकी, दि. ३१ डिसेंबर २०२१ ला निवृत्त झालेले विशेष शिक्षक, दीपक शिव व ३१ जानेवारी २०२२ ला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी नंदादीप देवगडे यांचा शाल, श्रीफळ, ग्रिटींग देवून सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा आनंद अंध विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुधाकर कडू यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून म.से.स. वरोराचे विश्वस्त व स्वरानंदवनचे प्रमुख सदाशिवराव ताजने,आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन च्या मुख्याध्यापिका विद्या टोंगे, संधिनिकेतन अपंगांच्या कर्मशाळेचे अधिक्षक रवींद्र नलगिंटवार, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर मंचावर उपस्थित होते. आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व भविष्यातील आव्हानेही मांडली तर शाळेतील वाचाउपचार तज्ज्ञ घोलप यांनी आपल्या मनोगतातून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. सदाशिवराव ताजने व सुधाकर कडू यांनी आपल्य भाषणातून शाळेच्या प्रारंभापासूनचा दृष्टीपट सादर केला. दीपक शिव, हंगे सर, हिरामण शेरकी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे वातावरण भावुक झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विशेष शिक्षिका सीमा बावणे व सामाजिक कार्यकर्ता गुलाब शेंडे यांनी केले तर सुहास देवडे यांनी अतिथींचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी श्रद्धेय बाबा व मातृतुल्य साधनाताई यांचे तैलचित्र काढल्याबद्दल शाळेतील कलाशिक्षक प्रल्हाद ठक यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव आदरणीय डाॅ.विकासभाऊ व डाॅ. भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद लाभले. संस्थेचे विश्वस्त मा.कौस्तुभ आमटे व पल्लवीताई आमटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य प्राप्त झाले.