निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाचे उपाय 'धर्म नियमा'त सांगितले आहेत - विजय घुगे #vijayghuge - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१३ डिसेंबर २०२१

निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाचे उपाय 'धर्म नियमा'त सांगितले आहेत - विजय घुगे #vijayghugeनिसर्ग संरक्षण आणि संवर्धनाचे उपाय 'धर्म नियमा'त सांगितले आहेत - विजय घुगे

नागपूर, १२ डिसेंबर

पर्यावरण संरक्षणात प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे तरच, जगाला पर्यावरण रक्षणाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रमात काम करणारे 'मैत्रवन'चे संयोजक डॉ. विजय घुगे यांनी केले. ते ग्रामायण नागपूरच्या ज्ञानगाथा कार्यक्रमात 'परंपरा भारताची, निसर्ग संवर्धनाची' विषयावर बोलत होते. डॉ. घुगे यांना उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था संचालक व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. घुगे म्हणालेत की, आज पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी विज्ञान जे उपाय सांगत आहे ते भारताच्या संस्कृतीत 'धर्म नियम' म्हणून हजारो वर्ष आधीपासून सांगण्यात आले आहेत. भोजनाआधीची चित्रावळ, नैवेद्य, वृक्षपूजा (वटसावित्री इत्यादी) निसर्ग संवर्धनाशी जुळलेले आहेत. राजस्थानमधील बिष्णोई जातीची तर सर्व शिकवणच पर्यावरण आणि प्राणी संवर्धनाशी जुळलेली आहे. देवराई, अभयारण्य हे पर्यावरण आणि प्राणी संवर्धनचेच भाग आहेत.

वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन यांचा आज पर्यावरण आणि निसर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरण दूषित होण्यासोबत अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. यावर ताबडतोब उपाय आणि आवश्यक काम झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या संविधानातही निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणासाठी शासन आणि नागरिकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. हे काम केवळ शासनावर सोडून चालणार नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. शासन, गाव, स्वयंसेवी संघटना यासोबत नागरिकांनीही आपली जबाबदारी निभावली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने फक्त एक झाड लावून ते वाढवले तरी देशात वृक्षसंवर्धनाचे मोठे काम होईल. पृथ्वी, पर्यावरण - निसर्ग आपल्याला, आधीच्या पिढीकडून ठेव म्हणून मिळाले आहे. आपण याचे विश्वस्त (ट्रस्टी) आहोत. ही ठेव आपल्याला अशीच पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची आहे; या भावनेने निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. घुगे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक, पाहुण्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन ॲड्. जयश्री आलकरी यांनी केले.