सेवानिवृत्त शिक्षकांनी समाजाच्या उन्नतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा - सौ भारतीताई पाटील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ डिसेंबर २०२१

सेवानिवृत्त शिक्षकांनी समाजाच्या उन्नतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा - सौ भारतीताई पाटील
सेवानिवृत्त शिक्षकांनी समाजाच्या उन्नतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा

- सौ भारतीताई पाटील, सभापती अर्थ,शिक्षण व क्रीडा समिती, जिप नागपूर यांचे आवाहन

समारंभ स्थळी सुंदर आकर्षक रांगोळीचे प्रदर्शन, शिवतीर्थ किल्ल्याची प्रतिकृती व भिंतीवर रेखाटलेल्या शिवाजी महाराजांची हुबेहूब चित्रे आकर्षणाची विषय ठरली.

पंचायत समिती नागपूर अंतर्गत वाडी समूह साधन केंद्रातील सन 2019 ते 2021 या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे उदघाटन जिप अर्थ, शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती भारतीताई पाटील यांच्या शुभहस्ते, पं स सभापती रेखाताई वरठी यांचे अध्यक्षतेखाली व प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी साबेरा शेख, गट शिक्षणाधिकारी राजेशकुमार लोखंडे, विस्तार अधिकारी भास्कर झोडे, सुशील बनसोड, प्रेमा दिघोरे यांचे प्रमुख उपस्थितीत जिप प्राथमिक शाळा, दवलामेटी हेटी येथील प्रांगणात पार पडले.
सर्वप्रथम श्री सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यानंतर मान्यवर सर्व अतिथींचे स्वागत गीताने तसेच गुलाबाचे रोपटे व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर वाडी समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून कोविडच्या लॉक डाऊन काळात शिक्षकांच्या निवृत्तीनंतर सुद्धा एकमेकांना भेटणे कठीण होते त्यामुळे मागील दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालांतराने एकूण 14 सेवा निवृत्त शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले.
यानंतर सत्कार मूर्ती पुष्पा गावंडे (श्रमिकनगर), भास्कर क्षीरसागर (वाडी क्र 2 ), मंदा बालपांडे (वाडी टेकडी), प्रकाश धवड (लाव्हा), रामेश्वर मुसळे (सोनबानगर), प्रवीण मेश्राम (सोनेगाव निपाणी), प्रभा भिसे (महादेवनगर), संध्या राऊत (वाडी क्र 1) उमा चौधरी (दवलामेटी हेटी) यांचा गुलाब रोपटे, शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कार समारंभाच्या उदघाटक जिप शिक्षण सभापती भारतीताई पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत व स्वरचित कवितेच्या ओळी ऐकवीत शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना "तुम्ही नोकरीतून निवृत्त झाले आहेत आयुष्यातून नव्हे" असे सांगत यापुढे समाजाच्या उन्नतीसाठी सक्रिय सहभाग घेऊन आपले उर्वरित आयुष्य खर्ची घालावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.

प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून उपस्थित शिक्षकांशी संवाद साधत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. कोविडमुळे आपण सर्व आभासी जगात आयुष्य घालवत असतांना एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रत्यक्षात एकत्र येऊन संवाद साधण्यासाठी अशा कार्यक्रमातून नक्कीच फायदा होतो असे प्रतिपादन केले.
शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना सतत प्रेरणा देण्यासाठी करीत असलेल्या केंद्रप्रमुखांच्या कार्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली.

सत्कार समारंभाच्या अध्यक्षा पं स सभापती रेखाताई वरठी व नवनिर्वाचित पं स सदस्य सुलोचना ढोके यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

सत्कारमूर्ती तथा दवलमेटी हेटी प्राथमिक शाळेच्या से नि मुख्याध्यापक उमा चौधरी यांनी भावनाप्रधान मनोगत व्यक्त करून पैशापेक्षा माणुसकीचा ओलावा देणारी माणसे मला मिळाली असल्याने माझे आयुष्य जगणे सोपे झाल्याचे सांगितले.

सत्कारमूर्ती भास्कर क्षीरसागर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्तिचे सर्व आर्थिक लाभ जिप प्रशासनाकडून तातडीने मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

ग्राम पंचायत कमेटी कडून सरपंच श्रीमती उमरेडकर, उपसरपंच, ग्रा पं सदस्य व ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे यांनी श्रीमती उमा चौधरी यांचा शॉल व श्रीफळ देऊन स्वतंत्रपणे भावपूर्ण सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा दावळे यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा चौधरी यांनी पार पाडले.
यावेळी उपस्थित मान्यवरांना व शिक्षकांना श्रीमती उमा चौधरी यांचेकडून सहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज उमरेडकर, पुरुषोत्तम चिमोटे, रजनी चौधरी, कमलाकर राऊत, संजय नागरे, सचिन कळपाते, दिपचंद पेनकांडे, अनिल गेडाम, प्रिया मौनदेकर, रंजना काकडे, माधुरी घोरमाडे, कल्पना राजूरकर, अर्चना ठोंबरे, रुपेश भोयर, अनिल नाईक, अनिता पाटील, विजय बरडे, प्रिया नंदेश्वर, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.