Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१

कृषी विद्युत पुरवठा आकस्मिक खंडित केल्याबद्दल रब्बी हंगाम अडचणीत

कृषी विद्युत पुरवठा आकस्मिक खंडित केल्याबद्दल रब्बी हंगाम अडचणीत

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा..महावितरण विभागाचा भोंगळ कारभार..राजुरा : रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता कृषी विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे नलफडी, मूर्ती, विहीरगाव भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. अवाजवी विद्युत बिल आकारून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा काम महावितरण करीत आहे.याच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आज दिनांक 10 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले व कृषी विद्युत पुरवठा नियमित सुरू करण्याची मागणी या वेळी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


यावेळी सदाशिव साळवे, किशोर डाकरे ,अरुण डाकरे, नितेश डाकरे, अजय दाखरे ,दादाजी गिरसावळ, बंडू वडस्कर ,मारुती वडसकर, अजय अस्वले, दादाजी साळवे ,लहानुजी रामटेके, बाबाजी गिरसावळे, श्यामसुंदर डाहुले, सुभाष रामटेके, निखिल पोतले, अशोक मंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

तालुक्यातील नलफडी, मूर्ती, विहीरगाव षेत्रातील कृषी पंपांचे विद्युत कनेक्शन विद्युत मंडळ राजुरा व विरुर स्टेशन यांचेकडून सक्तीने बंद करण्यात आलेले आहे. विद्युत बिलाच्या थकीत बिलाबाबत आकारणीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी व चर्चा सुरू असताना अचानकपणे विद्युत कनेक्शन कापल्याने शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामावर मोठे संकट ओढवले आहे. शेतामध्ये मिरची, कापूस, हरभरा, गहू ही उभी पिके पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे .या हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस, धान ,सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा संकटात वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी विद्युत पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केलेली आहे. विद्युत मंडळाचे थकीत वीज बिलांच्या हप्ते पाडून द्यावे व चुकीचे विद्युत बिल तात्काळ दुरुस्ती करून द्यावे अशी विनंती शेतकऱ्यांनीही या अगोदर केलेली आहे .मात्र शेतकऱ्यांच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत वीज वितरण कंपनीने मनमानी धोरण राबवले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना डिसेंबर व जानेवारी महिन्यात मुख्यता वीज पंपाचा वापर करून सिंचन करावे लागते .वर्षभरात मोजकेच काही महिने कृषीपंपचा वापर शेतकरी करतात. मात्र वीज वितरण कंपनीने अवाजवी विद्युत बिल आकारून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणले आहे. शिवाय रब्बी हंगामाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीने डीपी वरूनच विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून व पैशांची जमवाजमव करून विद्युत बिल भरलेले आहे. मात्र डीपी वरूनच विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे जे शेतकरी विद्युत बिल भरलेले आहेत तेही सिंचनापासून वंचित आहेत. प्रत्यक्ष शेतकरी बांधव वर्षभरात रब्बी हंगामाच्या वेळेलाच विद्युत मीटर चा वापर करतात. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांनी वापर केलेल्या वीज मीटरची रिडींग घेऊन त्यांना बिल देण्यात यावे .अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र सरासरी वर्षभराचे वीज आकारणी करून शेतकऱ्यावर प्रचंड आर्थिक बोजा लागण्याचा काम वीज वितरण कंपनी करीत आहे. त्यामुळे केवळ एक किंवा दोन महिने वीज वापरल्यानंतर प्रचंड प्रमाणात वीज आकारणी करण्यात येत आहे महावितरण कंपनीचे आभियंता व कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत नसल्याने प्रचंड रोष शेतकर्‍यांमध्ये आहे. एवढेच नव्हे तर दिवसा विद्युत पुरवठा खंडित करून रात्र ला काही ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू ठेवत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्र ला शेतावर जावे लागते .एकीकडे जंगली प्राण्यांची भीती अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी काही भागात रात्रीला पाणीपुरवठा करण्यासाठी जावे लागत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा दिवसालाच सुरळीत ठेवण्याची मागणी केलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या जीविताला कुठलाही धोका होणार नाही. वीज वितरण कंपनीने कृषी विद्युत पुरवठा नियमित करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अविनाश जाधव व परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनातून दिलेला आहे.


रब्बी हंगामाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीने मनमानी करून शेतकऱ्यांचे कृषी विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होण्याची शक्यता आहे याला जबाबदार महावितरण कंपनी राहील. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिल्ली, पंजाब ,तेलंगाना राज्याच्या धर्तीवर सरसकट मोफत विद्युत पुरवठा देण्यात यावा व वीज बिल माफ करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

अविनाश जाधव,
माजी जिल्हा परिषद सदस्य.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.