लस घेतली नसल्यास भाजी बाजारात प्रवेशबंदी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० नोव्हेंबर २०२१

लस घेतली नसल्यास भाजी बाजारात प्रवेशबंदी

लस घेतली असेल तरच बाजारात प्रवेशNo entry into the vegetable market unless vaccinated

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मनपाचे कडक पाऊल

चंद्रपूर, ता. १० : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपा कार्यालयातील सभागृहात महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्यासह आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाची चमू उपस्थित होती.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरण केंद्रावर जानेवारी ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ लाख ९३ हजार ५८१ नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली, तर यातील ९९ हजार ६२० नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. मात्र, शहरातील एकूण पात्र व्यक्तींच्या तुलनेत लसीकरणाचा आकडा अद्याप कमी आहे. आरोग्य विभागाने शहरात २१ केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे सर्व पात्र व्यक्तींनी तातडीने लस घ्यावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार केले आहे.

शहरात शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश शासनाचे आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरच्या आधीच उद्दिष्ट घेऊन प्रत्येक आस्थापनाने कर्मचाऱ्यांची व सामान्य नागरिकांचे लसीकरणाचे नियोजन करा, असे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी बैठकीत दिले.

औद्योगिक वसाहती, उद्योग समूह या ठिकाणच्या कर्मचारी, कामगारांनी किमान पहिला डोस घेतल्याचा पुरावा दाखविणे बंधनकारक असून, वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. जनतेशी सतत संपर्क येणाऱ्या प्रत्येक सेवापुरवठादार, फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी लसीकरण करणे बंधनकारक असून, मनपाची चमू गोल बाजार, गंज मार्केट आणि भाजी विक्रीच्या ठिकाणी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र तपासणी करणार आहे. त्यामुळे सर्वानी तात्काळ लस घ्यावी, शिवाय प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.