Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात अंगणवाडी सेविकांचे महत्वाचे योगदान -उपमुख्यमंत्री अजित पवार

 समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात अंगणवाडी सेविकांचे महत्वाचे योगदान

-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे दि.३०-ग्रामीण भागातील लहान मुलांचे भोजन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेत त्याच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांचे समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात महत्वाचे योगदान आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा ग्रामविकासचा कणा असलेल्या स्त्रीशक्तीचा सत्कार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महीला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस,व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, महिला व बालकल्याण सभापती पुजाताई पारगे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, कृषि सभापती बाबूराव वायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी उपस्थित होते.


श्री.पवार म्हणाले, अंगणवाडी सेविका खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करतात. ग्रामीण भागातील घराघरात त्यांचा संपर्क असतो. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय योजनांचे आणि परिणामतः शासनाचे यश त्यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. शेती आरोग्य, पोषण आहाराच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहीचविण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.


कोरोनाकाळात अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ती यांनी चांगले काम केले. कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका जगात असताना अंगणवाडी सेविकांनी आपल्या परिसरातील नागरिकांना मास्क वापराबाबत आग्रह करावा असे आवाहन श्री.पवार यांनी केले. चांगल्या कामात सातत्य ठेवणे महत्वाचे असून पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी पुरस्कार विजेत्यांवर आहे, उद्याचा जबाबदार नागरीक घडविण्यासाठी मजबूत पाया तयार करण्याची महत्वाची भूमिका अंगणवाडी सेविकांची आहे,  असेही ते म्हणाले.


प्रास्ताविक श्रीमती पारगे यांनी केले. कोरोना काळातही मिशन अंगणवाडी कायापालट यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २१ अंगणवाडी सेविका, २१ मदतनीस आणि ३ पर्यवेक्षिकांना पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी सीएसआर वापरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘महानुशा’ प्रणालीची माहिती दिली.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.