एका पिसाळलेल्या कुत्रीने धरले साऱ्या गावाला वेठीस. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ नोव्हेंबर २०२१

एका पिसाळलेल्या कुत्रीने धरले साऱ्या गावाला वेठीस.

पिसाळलेल्या कुत्रीने घेतला १३ जणांना चावा.
बंदोबस्त करण्याची नवेगावबांध ग्रामवाशियांची मागणी.
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगावबांध दि.३ नोव्हेंबर:-
येथे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर, गल्लीबोळात, बेवारस कुत्र्यांनी हैदोस घातला असून, आतापर्यंत एका पिसाळलेल्या कुत्रीने एका चार वर्षीय बालकासह १३ जणांना चावा घेतला आहे. सदर बालकाला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावात सर्वत्र दहशत पसरली असून, एकच खळबळ उडाली आहे. सदर बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायतने करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नवेगावबांध येथे  पिसाळलेल्या कुत्रीने  चार वर्षीय चिराग धनराज मेश्राम या बालकाला काल दिनांक 2 नोव्हेंबर रोजी गालाला,डोळ्याला  व पोटाला चावा घेतला. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत या पिसाळलेल्या कुत्रीने १३ लोकांचा चावा घेतला आहे.
सध्या दिवाळीच्या सणाची धामधूम आहे गावातील महिला पुरुष मुलाबाळांसह बाजारपेठेत खरेदीकरिता गर्दी करीत आहेत.नागरिक धाकधूकीने गावात वावरत आहेत. सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान प्रधान मोहल्ल्यात याच कुत्रीने एका पांढऱ्या कुत्र्याचा चावा घेतल्याचे समजते. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
कुत्री पिसाळलेली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गावातील वार्डात,मोहल्यात,मुख्य रस्त्यावरून सावधतेने ये -जा करावे. ग्रामवाशियांणी पिसाळलेल्या कुत्र्यापासुन सावधान राहावे. तसेच आपल्या मुलाबाळांना सुरक्षित ठेवावे. नागरिकांनी तसेच तरूणांनी या पिसाळलेल्या कुत्र्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पाळत ठेवावी. पिसाळलेल्या कुत्र्याचा 
बंदोबस्त करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी स्थानिक नागरिकांना केले आहे.दरम्यान पिसाळलेल्या कुत्रिचा बंदोबस्त करणाऱ्यास ५५१ रुपये बक्षीस देण्यात येईल.असे ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.तर सामजिक कार्यकर्ते आशिष घोटे यांनी २५१रुपयाचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.या घटनेने गावातील नागरिक सतर्क झाले,असून जोतो कुत्र्यांवर नजर ठेऊन आहे.