खा. बाळू धानोरकर यांच्या हस्ते तुकूम येथे विकासकामांचे लोकार्पण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

खा. बाळू धानोरकर यांच्या हस्ते तुकूम येथे विकासकामांचे लोकार्पण
खा. बाळू धानोरकर यांच्या हस्ते तुकूम येथे विकासकामांचे लोकार्पण


चंद्रपूर, ता. ०१ : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत दिनांक १ नोव्हेंबर रोजी हनुमान नगर, तुकूम येथे व्यायामशाळा इमारत बांधकामाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष दिनेश चोखारे, माजी महापौर संगीता अमृतकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेविका सुनीता लोढिया, सकिना अन्सारी, रामू तिवारी, प्रशांत दानव,माजी नगरसेवक संतोष लहामगे यांची कार्यक्रमस्थळी मंचावर उपस्थिती होती.

सन २०१८-१९ च्या स्थानिक खासदार विकास निधीअंतर्गत तुकूम प्रभाग क्र. १ मधील हनुमान नगर येथील देवी अपार्टमेंटसमोर असलेल्या श्री स्वामी समर्थ शिवनेरी बालोद्यानातील ३९५२० स्क्वेयर फुट खुल्या जागेपैकी १५७३.३४ स्क्वेयर फुट जागेवर स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २६ लक्ष रुपये आहे.

लोकार्पण कार्यक्रमात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खा. बाळू धानोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्थानिक प्रशासनाला प्रोटोकॉलनुसार महापालिका क्षेत्रातील विकासकामे व इतर संबंधित कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार घेण्याचे आदेश दिले. तसेच कोविड अजून संपला नसल्याचे सांगत, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले. आपल्या संबोधनात त्यांनी व्यायामशाळेतील साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांची समिती बनवून सदर व्यायामशाळेचे संचालन केले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेद्वारे लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सुरु असलेल्या भगीरथ प्रयत्नांचा उल्लेख मोहिते यांनी केला. शहरातील ८३% नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरीही ते पुरेसे नसून कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी नागरिकांनी अगत्याने लसीकरण करून घ्यावे, तसेच कोविड नियमावलीचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस महापालिकेचे उपायुक्त अशोक गराटे यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तर संचालन संगीता वासेकर यांनी केले. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.