एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य परिवहन विभागातील वाहतूक नियंत्रकासह 14 कर्मचार्‍यांचे निलंबन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, नोव्हेंबर ०९, २०२१

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य परिवहन विभागातील वाहतूक नियंत्रकासह 14 कर्मचार्‍यांचे निलंबन


चंद्रपूर/ललित लांजेवार:
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या एकापाठोपाठ एक आत्महत्या होत असतानाच राज्य परिवहन विभागातील तब्बल १४ कर्मचाऱ्यांचे परिवहन विभागाकडून निलंबन केले असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नुकसान व प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत संप करणार्‍या रापमच्या चंद्रपूर विभागातील वाहतूक नियंत्रकासह 14 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे .

चंद्रपूर विभागीय कार्यशाळेतील तथागत गणवीर, सुनील पुंडलिक वानखेडे, गौतम झाडे, अनिल दाते, राजुरा आगारातील भगवान अशोक यादव, सुरेश गंगाराम पुट्टेवार, चेतन डी. कोठे, प्रदिप राघोजी कुळमेथे, गोकुळ प्रल्हाद राठोडचंद्रपूर आगारातील मंगेश डांगे, अमोल महादेव पडगेलवार, राजु शामराव दांडेकर, राहुल करपे, महिला कर्मचारी ललिता अहीरकर, ह्या 14 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

या कारवाईने राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील कर्मचार्‍यांनी तिव्र रोष व्यक्त केलाय. दरम्यान चंद्रपूरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासह राज्यभर सुरु असलेल्या आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. अशावेळी राज्य सरकारनं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात पहिली कारवाई केलीय.

दरम्यान, एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलीय.

दिवाळीपूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती. तर चंद्रपुरातून अनिश्चित कालीन संपाची घोषणा झाली होती. त्यानंतर आज चंद्रपुरातील 14 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.