आयुध निर्माणी चांदाच्या बनावटीचा अदृश्य माईन भारतीय सेनेला समर्पित; महाप्रबंधकांनी हिरवी झेंडी दाखवून वाहन केले रवाना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ ऑक्टोबर २०२१

आयुध निर्माणी चांदाच्या बनावटीचा अदृश्य माईन भारतीय सेनेला समर्पित; महाप्रबंधकांनी हिरवी झेंडी दाखवून वाहन केले रवाना


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

:- आयुध निर्माणी चांदा येथे तयार करण्यात आलेल्या अदृश्य माईन - २ चा पहिला ५०० लाट भारतीय सेनेला दि. ३० सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राजीव पुरी यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनाद्वारे रवाना केला. यावेळी निर्माणाचे अधिकारी, विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका छोटेखानी कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. हे अदृश्य टॅंक मारक - माईन तयार करायला दहा ते बारा वर्षाचा कालावधी लागला. त्याकरिता डीआरडीओ शास्त्रज्ञ, आयुध निर्माणी कर्मचारी तसेच खाजगी कंपनी यांनी परिश्रम घेऊन हा अदृश्य माईन तयार केला. मार्च २०२२ पर्यंत २००० माईन भारतीय सेनेला पाठवण्यात येईल असे महाप्रबंधक पुरी यांनी सांगितले. काही कामगार बांधव निर्माणीच्या खासगीकरणामुळे अस्वस्थ आहे परंतु त्यांनी यास आव्हान न समजता संधी समजावी. भविष्यात या निर्माणीत मोठ्याप्रमाणात काम येईल. त्याचा आर्थिक फायदा येथील कामगारांना होईल असेही ते यावेळी म्हणाले. भारतीय बनावटीच्या माईन्सला २०,०००  माईन्सचा कंत्राट मिळाला आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताचे हे एक यशस्वी पाऊल आहे. तसेच संरक्षण उत्पादनक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शंभर कोटी पेक्षाही जास्त खर्च केला आहे. मागील तीन वर्षात ३४० कोटींचे संरक्षण उत्पादने अन्य देशाला निर्यात केली आहे. अद्रुश्य अमाईन्स विषयी माहिती देताना महाप्रबंधक पुरी म्हणाले आधुनिक युद्धतंत्र हे युद्धभूमीवर अनेक प्रकारची रणगाडे, अनेक लढाऊ वाहनांनी लढवण्यासाठी ओळखली जाते आणि हेच युद्ध यंत्र आपले शत्रू राष्ट्र अंगीकारत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून शत्रूचे रणगाडे आणि लढाऊ वाहनांना सीमेवरच रोखून धरण्यासाठी या माईन चा वापर केला जातो. अदृश्य माईन मार्क - २ आधुनिक तंत्रज्ञानावर स्मार्ट माईन आहे. यातील युनिट इन्फ्ल्यूरन्स फ्युज, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सेन्सरचा वापर करण्यात आला असून रणगाड्यातील चुंबकीय तरंगांना ओळखून माईंनचा विस्पोट करतो. आणि शत्रूंच्या टँकचा नाश करतो.
         याप्रसंगी दीपशिखा महिला कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉक्टर वनिता पुरी, क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसर एस. एस. मुंगसे, राकेश कुमार, सिनियर सिक्युरिटी ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जे. एस. घुमन, सिक्युरिटी ऑफिसर लेफ्टनंट कर्नल ए. एस. साधु, आयुध निर्माणी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय नक्षीने, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अमर कुमार, ओ. एफ. हायस्कूलचे प्राचार्य शिवानंद तिवारी, रुद्रा जडेजा, मधु हाभा, अशोक पांडे, गुरविंदर, ए. ए. मोक्षी, नवीन कुमार गहलोत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त महाप्रबंधक एस. के. भोला, सूत्रसंचालक जेडब्ल्यू एम. वंदना तांबे व सुनीता फरदे यांनी संयुक्तरीत्या तर आभार अतिरिक्त महाप्रबंधक मनीष मुखर्जी यांनी केले. कार्यक्रमाला कामगारांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.