कृषी पंपाना नियमित, सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा करा अन्यथा आंदोलन करण्याचा काॅंग्रेसचा इशारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ ऑक्टोबर २०२१

कृषी पंपाना नियमित, सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा करा अन्यथा आंदोलन करण्याचा काॅंग्रेसचा इशारा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजुरा तालुक्यात गेल्या वर्षभरापासुन कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा सुरू आहे. ग्रीप लावण्यात न आल्याने शेतकरी जीव मुठीत धरून पंप सुरू करतात. यामुळे आजवर वीजेचा शाॅक लागुन अनेक शेतक-यांचा बळी गेलेला आहे. वर्षभर तर सोडा ऐन पावसाळयात देखील वीज पुरवठा बंद असल्याने पावसाने उघडीप दिल्यावर शेतक-यांना स्प्रे पंपाव्दारे पाणी देऊन पिक वाचवावे लागते.

थकीत कृषी पंपाची वीज कापताना त्या डी पी वरील नियमीत बील भरणा-या पंपाची देखील वीज कापली जाते. शेतक-याला पंपासाठी जोडणी करीता प्रती पोल मोठी रक्कम भरावी लागत असल्याने शेतक-यांना लाखो रूपयांचा भुर्दंड केवळ विद्युत जोडणी करता बसत आहे.

पेल्लोरा ते निर्ली ही थ्री फेज लाईन गेल्या वर्षभरापासुन बंद असल्याने या भागातील शेती सिंचनापासुन वंचीत आहे.या पाश्र्वभुमीवर काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे वतीने प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ताजणे,राजुरा तालुका अध्यक्ष उमेष मिलमिले, राजुरा शहर अध्यक्ष संदीप आदे यांनी महाराष्ट्र् राज्य विद्युत वितरण कं. लि. चे मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांची भेट घेऊन संबंधितांना त्वरीत निर्देश देऊन शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी केली, अन्यथा या परीसरातील शेतक-यांसह लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा दिला.