11 नोव्हेंबरपासून सुरू होणार पहिली ते चौथीच्या शाळा National Education Day - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ ऑक्टोबर २०२१

11 नोव्हेंबरपासून सुरू होणार पहिली ते चौथीच्या शाळा National Education Day

 आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर (Diwali) राष्ट्रीय शिक्षण दिनाचे (National Education Day) औचित्य साधून (11 नोव्हेंबरपासून) सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.  पाचवी ते बारावीच्या शाळानंतर आता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून 1 ते 15 ऑक्‍टोबर या 15 दिवसांत राज्यभरात कोरोनाचे 32 हजार 319 रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे 50 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचण्याची मोहीम जोरदार सुरू असल्याने मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मुंबई महापालिका, नगर, पुणे, सोलापूर व सातारा हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला आहे.

दरम्यान, सध्या शहरातील आठवी ते बारावीचे तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीच्या ऑफलाइन शाळा सुरू आहेत. राज्यातील जवळपास 45 हजार शाळा सुरू झाल्या असून 65 लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत दररोज हजेरी लावत आहेत. कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू आहेत. दुसरीकडे, पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू नाहीत.

तरीही, कोरोनाचे नियम पाळून शहर-ग्रामीणमधील लाखो विद्यार्थ्यांना विशेषत: ज्यांच्याकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत, त्यांना ऑफलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्याच धर्तीवर आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. दुसरीकडे, शहरातील शाळांवरील निर्बंध शिथिल करून कोरोनामुक्‍त प्रभागांमधील सर्वच शाळा सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

त्या शाळांची स्वच्छता सुरू करण्यासंबंधीच्या सूचनाही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल.