नागपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आत्महत्या प्रतिबंधात्मक आठवडा राबविण्यास सुरुवात Nagpur Suside - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ सप्टेंबर २०२१

नागपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आत्महत्या प्रतिबंधात्मक आठवडा राबविण्यास सुरुवात Nagpur Suside

 वृत्त क्र. 234                                                                                                   दिनांक : 02 सप्टेंबर, 2021

नागपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आत्महत्या

प्रतिबंधात्मक आठवडा राबविण्यास सुरुवात

                                                   13 प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती अभियान 

                                                        पाटनसावंगीला 9 सप्टेंबरला कार्यक्रम होणार

नागपूर दि 02 : प्रत्येक नागरिकाचे मानसिक स्वास्थ हे सुदृढ समाजासाठी आवश्यक आहे. मात्र मानसिक अस्वास्थ्य असणाऱ्या नागरिकांवर उपाय करणेही शक्य आहे. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच अशा रुग्णांकडे लक्ष देऊन त्यांचे योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केल्या आहेत. येत्या दहा सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

             10 सप्टेंबर आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार आहे. यानिमित्त नागपूर जिल्ह्यामध्ये 13 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेगवेगळ्या दिवसाला जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. मुख्य शिबिर पाटणसावंगीला 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय व टाटा ट्रस्टचे तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक तेथे रुग्णांची तपासणी करणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात देखील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपर्कात नागरिकांनी रहावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

            एक सारखे नकारात्मक विचार येणे, पश्चाताप वाटणे, अपराधीपणाची भावना निर्माण होणे, भविष्याविषयी विनाकारण काळजी वाटणे, आपण काही कामाचे नाही, आपले आयुष्य व्यर्थ आहे, जगण्यात काही अर्थ नाही, असे वाटणे. नैराश्याचे लक्षण आहे. एखाद्याच्या बाबतीत भूक मंदावणे, सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे, शरीरसंबंधाची इच्छा न होणे, बेचैन वाटणे, कुठेच लक्ष न लागणे, एकाग्रता कमी होणे, निर्णय घ्यायला अवघड जाणे, अशी लक्षणे वारंवार दिसत असल्यास किंवा जगण्याप्रती आत्मीयता वाटत नसल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा सदस्याची तपासणी करावी. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

              नैराश्यावर उपचार असून इतर आजाराप्रमाणे या स्थितीतून रुग्ण बाहेर पडू शकतो. इतर आजाराप्रमाणे उपचाराअंती रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी सर्वप्रथम निदान लवकर होणे. आणि गरज वाटल्यास आवश्यक त्या तपासण्या होणे आवश्यक आहे. नागरिकांनी या काळामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा पद्धतीची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर यासाठी वैद्यकीय उपाययोजना केली आहे. कोरोना नंतर अशा पद्धतीच्या आजारात वाढ तर झाली नाही ना याबाबतही शासन जागरूक असून नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या आठवड्याचा लाभ घेण्याचे, आवाहन करण्यात येत आहे.