तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याची भीती | मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलीस करणार कारवाई Nagpur Mask Covid - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ सप्टेंबर २०२१

तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याची भीती | मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलीस करणार कारवाई Nagpur Mask Covid

 मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलीस करणार कारवाई

जिल्हा प्रशासनाकडून व्यापारी संघटनांशी चर्चा

ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा

नागपूर दि. 08 : रुग्णसंख्येत गेल्या दोन दिवसांपेक्षा कमी वाढ असली तरी जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेता व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी आज चर्चा केली. तसेच ऑक्सिजनच्या उपलब्धते संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस विभागाला देण्यात आले आहे.

            जिल्हाधिकारी विमला आर. यांनी या दोन्ही बैठकी घेतल्या. सकाळी साडेअकरा वाजता व्यापारी शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्व घटकांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासन देखील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. त्यामुळे या संदर्भात एकत्रित काही निर्णय होण्याची शक्यता आहे. एकाएकी कोणत्याही घटकावर अन्याय होईल, असे निर्णय घेतले जाणार नाही. मात्र आरोग्य सर्वोच्च असून त्यादृष्टीने व्यापारी व दुकानदार वर्गाने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

            अद्याप कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. मात्र यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या निर्णयावर नागपूर शहरातील व ग्रामीण भागातील निर्बंध अवलंबून असतील. यामध्ये स्थानिक स्तरावरील आवश्यकता, उपाययोजना व वस्तुस्थिती वरिष्ठांना वेळोवेळी कळविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

       दुसऱ्या, एका बैठकीमध्ये ऑक्सिजन उपलब्धतेसंदर्भात चर्चा करण्यात आली. मेयो, मेडिकल यासोबतच ग्रामीण भागात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला तर सर्व यंत्रणा प्रशिक्षित करणे, वाहन व्यवस्था व अन्य तांत्रिक बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या नेतृत्वातील चमू उपस्थित होती.

            दरम्यान, रस्त्यावरची गर्दी कमी ठेवणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वात आवश्यक असून मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, असे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना गेला असे समजून वागू नये. कोविड प्रोटोकॉल पाळावा, मास्क लावणे, गर्दी कमी करणे, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणे, याकडे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.