कोविड तिसरी लाट उंबरठ्यावर ; प्रशासन लागले जय्यत तयारीला | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ सप्टेंबर २०२१

कोविड तिसरी लाट उंबरठ्यावर ; प्रशासन लागले जय्यत तयारीला |

                                                                                                    दिनांक : 07 सप्टेंबर, 2021

कोविड तिसरी लाट उंबरठ्यावर ; प्रशासन लागले जय्यत तयारीला

·         आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

·         कोरोना परिस्थीतीचा आढावा

·         ग्रामीण व शहरी भागातील उपाययोजनांची  घेतली माहिती

·         तपासण्या व त्याचे विश्लेषण गंभीरतेने करण्याचे निर्देश

नागपूर दि. 07 : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची नांदीच आहे. गौरी-गणपतींच्या सणांची उत्सवप्रियता ही या संभावित लाटेला पूरक ठरू नये, यासाठी प्रशासन युध्दपातळीवर कामाला लागले आहे. त्याच दृष्टीने आज छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण राहूल माकणीकर, उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली या प्रमुख अधिकाऱ्यांची  बैठक घेतली.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी जगदीश कातकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे  प्रामुख्याने उपस्थित होते. निर्बंधातील शिथिलकरणामुळे बरेच नागरिक हे कोविड सुरक्षानियमांचे पालन करत नाही. तसेच सणासुदीच्या तयारीसाठी मोठया प्रमाणावर बाजारपेठात व घराबाहेर पडून खरेदी करत आहेत. परिणामी संक्रमणाची वाढ ही रुग्णसंख्येच्या दुहेरी संख्येत दिसत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला म्हणाल्या.

काल पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा  करून त्यांची मते लक्षात घेणार आहेत. बेफिकीर वृत्तीमुळे दुसऱ्या लाटेची भयानक तिव्रता सर्वांनी अनुभवली आहे. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. संभावित निर्बंध हे नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. सुरक्षितरित्या सण साजरे केले जाऊ शकतात हे पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनुभवले आहे.

राज्य शासनाच्या गणेशोत्सवासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसारित करूनही नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे तिसरी लाट दारावर येऊन ठेपण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळेतच प्रतिबंध करणे गरजेचे असल्याचे मत महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. मात्र हे करण्यापूर्वी सर्व प्रभावित होणाऱ्या घटकांशी चर्चा करण्यात येईल. कालच साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत.

तसेच रस्त्यांमार्फत होणाऱ्या आंतरराज्यीय प्रवाशांची अकस्मातरित्या कोरोना चाचणी करणे, तसेच दंडाच्या कार्यवाहीला आणखी गतिमान करणे, ॲटो-रिक्षाव्दारे गर्दीच्या ठिकाणी कोरोनासंबंधी वेळोवेळी जाहिर घोषणा देण्याबाबत उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली यांनी सांगितले.

 कोविड अनुषंगिक तपासणी जलद करतानाच त्यांचे  विश्लेषण गंभीरतेने करण्याचे निर्देशही आरोग्य यंत्रणाना देण्यात आले आहेत.

जिवनावश्यक सोडून अन्य गर्दी नियंत्रणासाठी वेळेची मर्यादा कमी करण्यासंबंधी  सध्या प्रशासन विचार करत आहे. लवकरच व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक आणि अन्य घटकांशी बैठकी होणार आहेत. ज्या नागरिकांचा दुसरा डोस काही कारणाने प्रलंबित राहिला आहे, त्यांनी प्राधान्याने तो घ्यावा. तसेच लसीकरणासाठी पूरेसा साठा उपलब्ध असून लस घेण्याचे आग्रही प्रतिपादन  प्रशासनाने केले आहे.