पोंभूर्णा येथील एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी शासन विशेष लक्ष देणार : उद्योग मंत्री सुभाष देसाई - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट १८, २०२१

पोंभूर्णा येथील एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी शासन विशेष लक्ष देणार : उद्योग मंत्री सुभाष देसाई

आ. सुधीर मुनगंटीवार यांची  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चाचंद्रपुर - जिल्ह्यातील आदिवासीबहुल  मागसित पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने त्वरित संबंधितांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात येईल तसेच या औद्योगिक वसाहतीत जास्तीत जास्त उद्योग येतील याकडे शासन विशेष लक्ष देईल असे आश्वासन उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले. 

पोंभूर्णा येथील एमआयडीसी  लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत निवेदन सादर केले व चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत आ. मुनगंटीवार म्हणाले, पोंभुर्णा हा आदिवासी बहुल नक्षल प्रभावित तालुका आहे. या तालुक्‍यात नवे उद्योग यावे व परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्‍या संधी मिळाव्‍या यादृष्‍टीने एमआयडीसी स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. या औद्योगीक क्षेत्रासाठी एकुण १८४.६७ हे.आर. इतके क्षेत्र अधिसुचित करण्‍यात आले होते. त्‍यापैकी कोसंबी रिठ येथील १०२.५० हे.आर. क्षेत्राची संयुक्‍त मोजणी पुर्ण झालेली आहे. त्‍यापैकी ५४.५२ हे.आर. क्षेत्रातील ४९ खातेदारांनी भुसंपादनास संमती दिलेली आहे. सदर १०२.५० हे.आर. क्षेत्रास महाराष्‍ट्र औद्यागीक विकास अधिनियम १९६१ मधील कलम ३२ (१) लागु करण्‍यास शासनाने मान्‍यता प्रदान केलेली आहे.

पोंभुर्णा तालुक्‍याचा औद्योगीक विकास व्‍हावा तालुक्‍यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्‍ध व्‍हावी या दृष्‍टीकोनातुन पोंभुर्णा येथे पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी स्‍थापन करण्‍यात आली असुन ही कंपनी आदिवासी महिलांची महाराष्‍ट्रातील पहीली कुकुटपालन व्‍यवसाय करणारी संस्‍था आहे. तसेच पोंभुर्णा तालुक्‍यात दुग्‍ध व्‍यवसाय प्रकल्‍प, टुथ पिक तयार करण्‍याचा प्रकल्‍प, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड ऑर्ट युनिट, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत आयटीसी कंपनी व बांबु विकास मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने अगरबत्‍ती उत्‍पादन प्रकल्‍प असे विविध प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे.

पोंभुर्णा औद्योगिक क्षेत्र स्‍थापन करुन त्‍वरित कार्यान्वित करण्‍यासाठी सद्यस्थितीत भुसंपादन तसेच शेत-यांना संपादित जमिनीचा मोबदला देण्‍याकरीता येत असलेल्‍या अडचणीचे निराकरण करणे आवश्‍यक आहे असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.

या प्रकरणी  तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करून संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येईल व सदर एमआयडीसी लवकर कार्यान्वित करण्यात येईल अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली.