आठवणीतली यामाह RX100 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ ऑगस्ट २०२१

आठवणीतली यामाह RX100

 यामाह ची RX100 मोटरसायकल आवडली नाही असा माणुस भारतात शोधून सापडणार नाही.एकदा तरी यामाह  RX100 फिरवुन आणावी असे प्रत्येकाला वाटत असते.

आठवणीतली यामाह RX100१९८५ चा तो काळ होता. भारतीय रस्त्यावर त्यावेळी रॉयल एनफिल्डची "बुलेट" व जावा कंपनिची "येझदी" या मोटरसायकल फिरत होत्या.बुलेट व येझदी या ३५० सीसी व २५० सीसी प्रकारात मोडत होत्या.दिसायला बोजड खडबडीत असणाऱ्या या मोटरसायकली पर्याय नव्हता म्हणुन युवकवर्ग नाईलाजाने वापरत होता.

युवकांची मागणी व आवड पाहून "एस्कॉर्ट" या ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनिने जपानच्या "यामाह" कंपनी बरोबर सहकार्य करून "यामाह RX100" मोटरसायकल भारतात लॉन्च केली.सुरूवातीला जपानने ५००० मोटरसायकल भारतात पाठवल्या आणि पाहता पाहता त्या हातोहात खपल्या. 

फक्त ९९ सीसी क्षमता असणारी "टु स्ट्रोक" यामाह वजनाने पण अगदी हलकीफुलकी होती.कमी वजन व स्टायलीशपणा पाहता यासारखी दुसरी देखणी मोटरसायकल त्या काळात तर दुसरी कुठलीच नव्हती.जोडीला यामाहचा स्टायलीश दमदार आवाज,बुलेट व येझदी पेक्षा जादा मायलेज व कमी मेंटेनन्स  शिवाय सर्वसामान्याना परवडेल अशी किंमत पाहता या मोटरसायकलची मागणी वाढली.

ज्यावेळी ही मोटरसायकल लॉन्च झाली त्यावेळी तिची किंमत १९,६०० च्या आसपास होती.आजही ही मोटरसायकल भाव खाऊन आहे.आजच्या तरुणाईला पण ही दुचाकी मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहे.

ही मोटरसायकल फक्त १०३ किलो वजनाची होती.मार्केटमध्ये धुरळा उठवलां.या बाइकने सर्वच विक्रम मोडीत काढले होते.त्याकाळी सोनसाखळी चोरं हे या बाइकचा सर्रास वापर चोरी करण्यासाठी करत होते. त्यामुळे पोलिसांसाठी ही मोटरसायकल डोकेदुखी ठरत होती.कॉलेजकुमारानाही ही स्टायलीश मोटरसायकल आवडु लागली होती.कॉलेजमधल्या प्रत्येक मुलाचं ही बाईक घेण्याचं स्वप्न होतं.त्याकाळात होणाऱ्या मोटरसायकल रेसिंग स्पर्धेत दहा पैकी आठ मोटरसायकली या यामाहच्या असायच्या.या मोटरसायकलीचा वेग जास्त असला तरीही खूप जास्त वेगात रस्त्यावर हि गाडी चालवणं धोकादायक होतं. ह्या गाडीचं वजन कमी असल्याने वेगाने गाडीचं संतुलन बिघडयाचं आणि त्यामुळे अपघात होत असत.

काळ सरत होता,पेट्रोल दर वाढत होते आणि जगात कमी इंधनात जास्त मायलेज देणारे तंत्रज्ञान विकसित होऊ घातलं होत... आणि हे तंत्रज्ञान "हिरो होंडा" च्या रूपात अवतरलं.हिरोहोंडाने "फोर स्ट्रोक" हे आधुनिक इंजिन प्रणाली आणली.यामध्ये कमी आवाज,जादा मायलेज देणारी व धुर विरहित "CD100" ही मोटरसायकल आणली.जागतिक हवा प्रदूषण,आवाज प्रदूषण मापनामध्ये ही मोटरसायकल फीट बसत होती.

नव्याकडे ग्राहक आकर्षला जाऊ लागला. व RX 100 ची अखेरची घरघर सुरू झाली. कारण यामाहची ही RX 100 मोटरसायकल जागतिक मापनात कुठेच बसत नव्हती.या मोटरसायकल मध्ये पेट्रोल घालतानाच आॉईल घालावे लागे,यामुळे इंधन या एक्झॉस्ट गॅसेस सोबत मिसळले जात असे आणि यामधुन पर्यावरणासाठी अत्यंत घातकअसणारा धूर बाहेर फेकला जात असे.

टु स्ट्रोक इंजिनच्या कर्कश आवाजाने आवाज व हवा प्रदूषण होते म्हणुन कंपनिला सरकारने हरकत घेतली. व आपले उत्पादन पुढे चालवायचे असेल तर,फोर स्ट्रोक इंजिनची अट घातली. पण यामाहाने डायरेक्ट १९९७ मध्ये  Rx100 चे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला.भारत सरकारने टू स्ट्रोक इंजिन उत्पादनावर बंदी आणली. यामुळेच भारत सरकारने टू स्ट्रोक इंजिन बंद करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला.व यामाह ने आपली गाडीचे उत्पादन बंद केले.काळाप्रमाणे न बदलण्याचा हा निर्णय होता.व अशा तऱ्हेने "लाखो दिल की धडकन" असलेल्या या यामाह Rx100 ही मोटरसायकल १९९७ मध्ये कायमची बंद झाली.

गाडीचं उत्पादन थांबलं असलं तरीही हिची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळेच हि रस्त्यावर आजही धावताना दिसते.रस्त्याने एखादी सुपरबाइक सुसाट वेगात गेली तर त्याचं फार असं अप्रूप वाटत नाही. एकापेक्षा एक अशा होंडा, हिरो, TVS, सुझुकीच्या सुपर बाइक तुम्हाला पाहण्यास मिळतील. पण, यातील एकही बाइक आजपर्यंत RX 100 ची बरोबरी करू शकणार नाही.

कोणाकोणाकडे अजुनही ही यामाहRx 100 मोटरसायकल आहेत त्यांनी त्या जपुन ठेवल्या असुन त्याची किंमत लाखापर्यंत सांगितली जाते.काहीजण मॉडीफॉय करून ही मोटरसायकल वापरतात.तरीही अजुन ही मोटरसायकल आपला डिमांड ठेवुन आहे.


-अनिल पाटील,पेठवडगाव

9890875498