गडचिरोलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अवाजवी शिक्षण शुल्काविरोधात आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ ऑगस्ट २०२१

गडचिरोलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अवाजवी शिक्षण शुल्काविरोधात आंदोलन
गडचिरोलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अवाजवी शिक्षण शुल्काविरोधात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांच्या नेतृत्वात पालकांचा एल्गारEnglish medium schools in Gadchiroli
गडचिरोली : गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याअवाजवी शिक्षण शुल्काविरोधात पालकांनी एल्गार पुकारला असून आज याविरोधात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांच्या नेतृत्वात पालकांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन या शाळांवर कारवाई करा व शिक्षण शुल्कात 50 टक्के सूट द्या अशी मागणी केली.

संपूर्ण जग कोविड 19 च्या विळख्यात सापडले आहे. वर्षभरापासून राज्यातील शाळा बंद आहेत.राज्यातील इतर शाळाप्रमाणे गडचिरोलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत.या कालावधीत विद्यार्थी शाळेत येत नसतानाही ट्युशन फी व्यतिरिक्त संगणक शुल्क, वाचनालय शुल्क, इतर शुल्क पालकांकडून वसूल करीत आहे.
नागपूर सारख्या ठिकाणी ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शुल्कात 25 टक्के सूट देऊन पालकांना दिलासा दिला.पुणे जिल्हापरिषदेने 50 जिल्ह्यतील सर्व खाजगी शाळांचे शुल्क 50 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला.मग गडचिरोली सारख्या आदिवासी भागात 50 टक्के शुल्कात सूट का मिळू नये असा प्रश्न पालकांनी निर्माण केला.

    कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकरीवर गदा आली. अनेकांचे व्यवसाय बुडाले त्यामुळे पालक आर्थिक दुष्टचक्रात सापडले असताना शिक्षण संस्था पालकांना शुल्कासाठी तगादा लावत आहे. त्यामुळे पालक आर्थिक व मानसिकदृष्टया चिंताग्रस्त आहे.तसेच शाळेची फी न भरल्यास तुमच्या पाल्यांना ऑनलाइन क्लास मधून काढण्यात येईल अशी धमकी दिली जाते.त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील मुले शिक्षणा पासून वंचित होत आहे.गडचिरोली शहरातील नामांकित प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे व्यवस्थापन याबाबत आडमुठे पणाची भूमिका घेत आहे. या शाळेत 2 आगस्ट पासून आवर्तन चाचणी घेण्यात येत आहे त्याकरिता जोपर्यंत शुल्क भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुरविल्या जाणार नाही अशी भूमिका शाळेने घेतली आहे.नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या या इंग्रजी माध्यमांच्या शालेय व्यवस्थापनाच्या आडमुठे पणामुळे  विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
     
              महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत शाळेने शुल्क वसुली करू नये असे आदेश दिले असतानाही याला न जुमानता शुल्कासाठी पालकांना तगादा लावत आहे.काही शाळांनी सत्र 2021 -22 या शैक्षणिक सत्राकरिता चार ते पाच हजार रुपये शुल्कवाढ केली आहे त्यामुळे पालकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

            त्यामुळे याबाबत विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घेऊन शिक्षण शुल्कात 50 टक्के सूट द्यावी. व चालू सत्रात कोणतीही शुल्कवाढ करू नये अशी मागणीही पालकांनी केली.
    पालक व विद्यार्थी यांना आर्थिक व मानसिक देणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या शाळाविरोधात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांच्या नेतृत्वात पालकांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे दिलेल्या निवेदनातून दिला. यावेळी मुख्य शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार, निलेश चन्नावार, राजेश सोनटक्के, कृनाल पडालवार,प्रतीक मुंगेवार,जितेंद्र रायपुरे,विपुल चन्नावार, आदी पालक उपस्थित होते.


English medium schools in Gadchiroli