औरंगाबादेत 'एमआयएम'ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ ऑगस्ट २०२१

औरंगाबादेत 'एमआयएम'ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे.

औरंगाबाद - शहरात रविवारी (ता.१५) स्वातंत्र दिनी मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तालयात जात असताना पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना एमआयएमच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविल्याचा निषेध करण्यासाठी हे झेंडे दाखवण्यात आले. या प्रसंगी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, की कोणाच्या सांगण्यावरुन क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवले आहे. पालकमंत्र्यांनी फक्त निवडणुकीसाठी औरंगाबादेत यायचे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
          आधी युतीच्या काळात औरंगाबादसाठी जाहीर झालेले आयआयएम आणि एम्स हॉस्पीटल नागपूरला पळवले आणि आताच्या सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांनी औरंगाबादला जाहीर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविले आहे. मराठवाड्याच्या विकासावर गप्पा मारणाऱ्यांना हा अन्याय दिसत नाही का, अशी टिका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. क्रीडा विद्यापीठ का पळविले हा प्रश्न पालकमंत्री सुभाष देसाई यांना विचारणे आवश्यक आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी क्रीडा विदयापीठ पळविणाऱ्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अटक झाली तरी आमचे आंदोलन चालू राहणार आहे. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. खासदार इम्तियाज यांनी शनिवारी ( ता. १४) फेसबुक लाईव्ह करून १५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री देसाई यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. क्रीडा विद्यापीठ पळविणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जेव्हा आयआयएम आणि एम्सबाबत स्पष्टीकरण देत असताना औरंगाबादला इन्स्टीट्यूट ऑफ प्लानिंग, आर्किट्रेक्चर देण्याची घोषणा केली, तेव्हा विधानसभेत हे इन्स्टीट्यूट विदर्भाला न्या, आम्हाला आयआयएम दया, अशी मागणी केली होती अशी माहिती त्यांनी दिली. 
          क्रीडा विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्राला नेण्याचा घाट सुरू झालयानंतर, औरंगाबादच्या बैठकीत क्रीडा विद्यापीठ बाबत मी माहिती सांगितली असता, पालकमंत्री देसाई यांनी हे विद्यापीठ औरंगाबादलाच राहिल, असे आश्वासन दिले होते. मात्र क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्यात आले. कोणाच्या दबावाखाली हा विद्यापीठ पळविले असा सवाल केला.