कारची मोटरसायकलला धडक, युवक जागीच ठार, दोन जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ ऑगस्ट २०२१

कारची मोटरसायकलला धडक, युवक जागीच ठार, दोन जखमी

कारची मोटरसायकलला धडक, युवक जागीच ठार, दोन जखमी

कार चालकाचा घटनास्थळावरून पोबारा
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.13 ऑगस्ट:-
नवेगावबांध वरून देवरी तालुक्यातील पळसगाव येथे तीन युवक मोटरसायकलने जात असताना हेलिपॅड मैदाना नजीक बाळू मिस्त्री यांच्या घराजवळ गोठणगाव च्या दिशेने येणाऱ्या कारच्या धडकेने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार एक युवक जागीच ठार झाला, तर दोन युवक जखमी झाले. शैलेश नामदेव भोयर वय 24 वर्षे राहणार पळसगाव तालुका देवरी असे मृतकाचे नाव आहे. त्याच्या सोबत असणारे दोन युवक जखमी झाले. नवेगावबांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर अपघाताची माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व जखमी असलेल्या दोन युवकांना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल केले. नवेगावबांध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 13 ऑगस्ट दुपारी अडीच ते तीनच्या वाजेच्या दरम्यान देवरी तालुक्यातील पळसगाव येथील तीन युवक शैलेश नामदेव भोयर वय 24 वर्षे विलास भिवाजी कोवे वय 28 वर्षे अजय सो विंदा मरस्कोल्हे वय 21 वर्षे हे नवेगावबांध वरून स्वगावी पळसगाव येथे हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एमएच 35, एएफ 2893 ने नवेगावबांध चिचगड मार्गाने जात असताना, गोठणगाव कडून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच 35, एआर 0386 या क्रमांकाच्या कारने नवेगावबांध गोठणगाव मार्गावर बाळू मिस्त्री यांच्या गॅरेज जवळ मोटारसायकलला धडक दिली. यात झालेल्या अपघातात 24 वर्षीय शैलेश नामदेव भोयर याचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघात झाल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावर कार सोडून पोबारा केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या विलास भिवाजी कोवे वय 28 वर्षे, अजय सोविंदा मरस्कोल्हे वय 21 वर्षे, राहणार पळसगाव, तालुका देवरी हे दोघे जखमी झाले आहेत. नवेगावबांध पोलिसांनी या दोन्ही जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. कार चालकावर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.फरार झालेल्या कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.