चीनच्या पाणी वळवण्यामुळे भारतासह अन्य देशांनाही मोठा फटका | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ ऑगस्ट २०२१

चीनच्या पाणी वळवण्यामुळे भारतासह अन्य देशांनाही मोठा फटका |

चीनच्या पाणी धोरणाविरोधात दक्षिण बांगलादेश, म्यानमार, भूतान आदींनी एकत्रित येण्याची गरज


मेजर जनरल अजय चतुर्वेदी (निवृत्त) यांचे मत


मुंबई : ब्रह्मपुत्रा, आणि अन्य संलग्न नद्यांच्या पाण्याचा चीन गैरवापर करून त्यांच्या भागात धरणे मोठ्या प्रमाणात बांधत आहे. यामुळे केवळ भारतच नव्हे तर म्यानमार, भूतान,  बांगलादेश, नेपाळ या अन्य शेजारी राष्ट्रांवरही दुष्परिणाम होत आहे, यासाठीच संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन दक्षिण आशियातील या देशांच्या एकत्रिकरणाने चीनविरोधात आघाडी उघडणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत मेजर जनरल अजय चतुर्वेदी (Ajay Chaturwedi) (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या गुरुवारी दि. १२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ऑनलाईन संवादात ते बोलत होते. स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुरुवातीला महाजन यांनी भारत, जग यांच्या अनुषंगाने जलसंरक्षण आणि जलस्रोत, त्याची स्थिती आणि भविष्य यावर काही ठळक मुद्दे मांडले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाण्याचा वापर शस्त्र म्हणूनही कसा केला जाऊ शकतो, त्याची शक्यताही व्यक्त करीत चीनवर शरसंधान केले.

या वेळी बोलताना चतुर्वेदी म्हणाले की, चीनकडून पाण्याचे गैरव्यवस्थापन मोठ्या प्रमाणात होत आहे. ते पाणी वळवून त्यांच्या देशात अन्यत्र नेत आहेत. अधिकाधिक धरणे बांधून तेथे पाणी वळवत आहेत. त्यामुळे भारतालाही आणि अन्य शेजारी देशांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे.

पाण्यासंबंधातील करारला चीन धाब्यावर बसवीत असून डोकोलाम घटनेनंतर त्यांनी या संबंधात माहिती भारतालाही सांगण्याचे टाळले आहे. ते बांगलादेशला माहिती देत आहेत. ईएलएम या २००६ च्या कराराला तसेच १९९७ च्या ट्रान्स बॉर्डर नद्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या करारालाही  चीनने जुमानलेले नाही. पारिचूबाबतही त्यांनी तसे केले होते. ती घटना २००४-०५ च्या दरम्यानची आहे. त्यावेळी अकस्मात पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर पाणी आले मात्र सुदैवाने भारताच्या गोविंदसागर आणि भाकरा या प्रकल्पांनी त्या पाण्याला सामावून घेतल्याने अनर्थ टळला. ते पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर सोडले गेले की पूरस्वरूप स्थिती निर्माण झाली होती.  जर हे पाणी सामावून घेतले गेले नसते तर लुधियानासारखे शहरही पाण्याखाली गेले असते, असेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

 पाणी वाहून नेणारे जलभुयार तयार करण्याचे चीनचे मनसुबे आहेत. न्यूयॉर्कमध्ये १३७ किमी जलभुयार आहे तर चीनमध्ये तसे जलभुयार ८५ किमी आहे. युनान प्रकल्प (६०० किमी) आणि इंडसमध्ये त्यांना भुयार बनवायचे आहे. आजच्या घडीला  २२ दशलक्ष चिनी लोक त्यांच्याच देशात  निर्वासित आहेत कारण प्रदूषित पाणी हे आहे. ६०० ठिकाणी ही स्थिती आहे. चीनने जर हे पाणी या प्रकल्पांद्वारे मोठ्या प्रमाणात वळवले तर त्याचा फटका सर्वात अधिक  पूर्व बांगलादेशात बसेल, सुंदरबनवरही त्याचा परिणाम होऊ शकतो आणि अशा प्रकारच्या कृत्यांमुळे पर्यावरणाला आणि मानवतेच्या अधिकारालाही फटकारण्यासारखे होते, असेही चतुर्वेदी सांगितले.