जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी कर्डिले यांचा आगळा वेगळा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ जुलै २०२१

जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी कर्डिले यांचा आगळा वेगळा सत्कार

राहुल कर्डिले जिल्हाधिकारी म्हणून रुजू व्हावे ही चंद्रपूरकरांची प्रामाणिक इच्छा - पप्पू देशमुख

चंद्रपूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील राहुल कर्डिले यांची नुकतीच बदली झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्यरत होते.  प्रसिद्धीपासून दूर  राहून प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी आजपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व कोरोना आपत्तीमध्ये केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्ह्यातील नागरिकांतर्फे जनविकास सेने कडून दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 1 च्या दरम्यान त्यांचा आगळा-वेगळा सत्कार करण्यात आला.

जनविकास चे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कर्डिले यांना त्यांच्या कक्षातून बाहेर येण्याची विनंती केली. त्यानंतर बाहेर उपस्थित असलेल्या देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी राहुल कर्डिले यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला व टाळ्या वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बांबू पासून तयार केलेला टेबल लॅम्प,अॅम्प्लीफायर,टूथ ब्रश व ताडोबाच्या जंगलातील वाघाचे छायाचित्र तसेच शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जनविकासचे निलेश पाझारे,अनिल दहागावकर,इमदाद शेख, मनिषा बोबडे,कांचन चिंचेकर,आकाश लोडे,देवराव हटवार,गितेश शेंडे,राकेश मस्कावार,हर्षल पंदिलवार,तपस्वी उईके, महेश बावने,सुशिल डोर्लीकर, सतीश घोडमारे, सतीश येसांबरे, अमोल घोडमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये घड्याळाच्या काट्याप्रमाणे कर्डीले यांनी सेवा दिली.दुसऱ्या लाटेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये तातडीने कोविड रुग्णालय सुरू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. वागण्या-बोलण्यातील साधेपणा यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये ते लोकप्रिय झाले होते.जनविकास ने अचानक केलेल्या आगळ्यावेगळ्या सत्काराने कर्डिले सुद्धा भावुक झाले.

लोकाभिमुख कार्य करणाऱ्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची आज देशात  कमतरता आहे.अशा कठिण परिस्थितीमध्ये राहुल कर्डिले सारखे अधिकारी भारतीय लोकशाहीसाठी एक आशेचा किरण आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी दिलेल्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यानी भविष्यात जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात रुजू व्हावे ही जिल्ह्यातील नागरिकांची प्रामाणिक इच्छा आहे अशी प्रतिक्रिया या वेळी जनविकासचे  संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली.