शेतातील माती बोलते आणि पानं हसतात ....! रासायनिक शेती ते नैसर्गिक शेतीचा प्रवास | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जुलै २०२१

शेतातील माती बोलते आणि पानं हसतात ....! रासायनिक शेती ते नैसर्गिक शेतीचा प्रवास |

नैसर्गिक शेती उत्पादनांना शासनाने सहज व स्वस्त सर्टिफिकेशन द्यावे


 ग्रामायण कृषीगाथेत वीरेंद्र बरबटे यांची मागणी


Virendra Barbate

नागपुर-  ज्या शेतकऱ्याशी शेतातील माती बोलते आणि पानं हसतात  ते शेतकरी म्हणजे वीरेंद्र प्रेमदास बरबटे ! ग्रामायण तर्फे आयोजित कृषी गाथा 2 या कार्यक्रमात आपला रासायनिक शेती ते नैसर्गिक शेतीचा  प्रवास सांगत होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्री सुमित माइणकर यांनी वीरेंद्र बरबटे यांचे स्वागत करून केली, त्यानंतर प्रश्नोत्तर रुपात रासायनिक शेती ते नैसर्गिक शेती हा प्रवास आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व या विषयावर बरबटे यांनी खूप मनापासून प्रकाश टाकला. त्यांच्या प्रत्येक वाक्यात त्यांची शेती बद्दलची तळमळ दिसत होती.

 खरेतर त्यांची वडिलोपार्जित सोळा एकर शेती, आजोबां द्वारे केली जात होती ,वडील दुकानदारी करीत असत लहानपणी केवळ सुट्ट्यांमध्ये गावाला जाणे व्हायचे तेव्हा तिथले वातावरण त्यांना आवडत नसे, कारण वीज नसणे कच्चे रस्ते ,मातीची घरे‌ त्याची सवय नसायची.

परंतु आजोबा गेल्यावर त्यांनी शेती करण्याचा विचार केला.  1992 पासून त्यांनी नाइलाजाने शेती करण्यास सुरवात केली. सुरवातीला त्यांना शेतीतील काहीच माहिती नव्हती,  शेजारच्या शेतकऱ्याने एक पॅकेट युरिया वापरले तर हे दोन पॅकेट वापरीत. गावातील इतर शेतकरी त्यांना शेतीतील डवरा,रेंगी, बंडी असे शब्द विचारीत ज्याबद्दल वीरेंद्रजींना माहीत नसे.

अशी दोन वर्ष गेल्यावर त्यांनी शेती बटाईने करण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्यांना समाधान वाटले नाही म्हणून शेती ठेक्याने देण्याचा विचार केला ,अशातच दोन-तीन वर्ष निघून गेली. वीरेंद्र जी थोडेफार शेती शिकले, परंतु अजून मातीशी नाते जुळले नव्हते.

कृषी केंद्रातून रासायनिक खत आणल्या जाई,साहजिकच त्यांना तिथे पाटील म्हणून मान मिळे,तो मान हवासा वाटायचा. पण  एकदा त्यांनी चार एकरावर मिरची लावली, विकण्यासाठी जबलपूर किंवा दिल्लीला पाठवायचे ठरवले परंतु अत्यंत कमी भाव मिळत होता म्हणून भंडारा येथील बोरगाव जे मुख्य केंद्र होते तिथे ते मिरची घेऊन गेले अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरून अपमानित करण्यात आले म्हणून ते आपली  मिरच्यांची पोती घेऊन तसेच घरी आले.

त्यात त्यादिवशी त्यांना वाटले की शेतामध्ये सारं काही ठरलेलं असताना  विक्रीचा भाव मात्र आपल्याला ठरवता येत नाही. हे आपल्या हातात राहत नाही. आपल्या मालाची किंमत तिसराच कोणी  ठरवितो.

 करता करता दोन हजार चार साल आले. नागपूरला सुभाष पाळेकर यांच्या एका दिवसाच्या शिबिराला वीरेंद्र जी  उपस्थित राहिले. आणि त्या शिबिराने त्यांना दिशा दाखविली. त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचे ठरविले.

देवलापार च्या गोशाळेततून गोमूत्र आणि , गावातील देशी गाय असणाऱ्यां कडून शेण आणित.

पहिली दोन वर्षे यथा तथाच गेली, तिस-या वर्षीपासून मात्र फरक जाणवायला लागला. माती बोलू लागली.

त्यांनी गावात दवंडी देऊन कसायाकडे जाणारी गाई बैल घ्यायला सुरुवात केली. देशी वाणांचे बियाणे ही वापरू लागले. हळूहळू शेती समाधान आणि यश देऊ लागली. मिश्रपीक पद्धतीमुळे ही फायदा होऊ लागला.

आंबा हे मुख्य पीक असेल जो वर्षातून एकदा येतो त्याच्याखाली शेवगा ,जो वर्षातून दोन-तीन वेळा येतो, त्यानंतर हळद जी नऊ महिन्यातून एकदा येते. त्याखाली भाजीपाला वांगी मिरच्या वगैरे. पावसामुळे किंवा किडीमुळे एखादे पीक गेले तरी दुसरे पीक मिळते. त्यामुळे जास्त तोटा होत नाही.

एकदा नैसर्गिक शेतीचे महत्व लक्षात आल्यावर त्यांनी "नैसर्गिक शेती उत्पादनांना शासनाने सर्टिफिकेशन देण्याची सहज व स्वस्त पद्धती अमलात आणावी" अशी मागणी केली. "याशिवाय शासनाकडून नैसर्गिक शेती करणाऱ्यांना काहीही नको" असे त्यांनी स्पष्ट केले.

नगदी पिका बद्दलच्या प्रश्नावरही वीरेंद्रजींचे  म्हणणे होते कि नैसर्गिक शेतीमुळे जैवविविधता वाढते, नैतिक समाधान मिळते ज्याची किंमत कशातच होऊ शकत नाही. शेवटी वीरेंद्र जींनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही व्यवस्थित दिली.

तरुणांसाठी नैसर्गिक शेती खूपच चांगला पर्याय असल्याचे सांगत, प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने (जे नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे वैशिष्ट्य आहे असे वीरेंद्र जींच्या बोलण्यातून जाणवले) वीरेंद्र जींनी ही मुलाखत संपविली.