गेल्या दहा महिन्यापासून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन अडले, १९ जुलै पासून काम बंद आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ जुलै २०२१

गेल्या दहा महिन्यापासून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन अडले, १९ जुलै पासून काम बंद आंदोलन

गेल्या दहा महिन्यापासून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मानधन अडले 

आली उपासमारीची पाळी,१९ जुलै पासून काम बंद आंदोलन

 घरकुल लाभार्थ्यांची होणार आर्थिक कोंडी  संजीव बडोले प्रतिनिधी
 नवेगावबांध ता.२१ जुलै:- गोंदिया जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेचे काम करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यरत आहेत. माहे जून २०२० ते मार्च २०२१ या कालावधीचे एकूण १० महिन्याचे मानधन न मिळाल्यामुळे या ग्रामीण अभियंत्यांनी दिनांक १९ जुलै पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना देण्यात आले आहे. तालुक्यामध्ये बांधकाम विभाग (घरकुल),पंचायत समिती अर्जूनी मोर्गाव मध्ये १० ग्रामीण अभियंते सध्या कार्यरत आहेत. ग्रामीण अभियंत्यांच्या या आंदोलनामुळे घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते मिळण्यास विलंब होईल व लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी होईल अशी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने यांच्या मानधनासाठी पंचायत समिती स्तरावर निधीच उपलब्ध करून दिले नसल्याची माहिती आहे.
तालुका पातळीवर प्राप्त घरकुलाच्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांचे कामाचे टप्पे निहाय यांना मानधन मिळत असते. त्यामध्ये लाभार्थीचे घरकुल मंजूर झाल्यावर लेआउट देणे, जिओ टॅगिंग करणे, लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, टप्पे नीहाय हप्ते वितरित करण्यापूर्वी, प्रत्येक पातळीचे फोटो मोबाईल आवास ऐप मध्ये प्रत्यक्ष मोका पाहणी करून काढणे, वेळोवेळी लाभार्थ्यांना गृहभेटी व इतर आवश्यक कार्यालयीन कामे हे ग्रामीण अभियंते करीत आहेत. सध्या राज्यामध्ये कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू आहे. त्या कालावधीमध्ये शासन स्तरावरून १९ नोव्हेंबर २०२० पासून ५ जून २०२१ पर्यंत महाआवास अभियान ग्रामीण भागात राबविण्यात आले आहे. 


सदर अभियान काळामध्ये २०१६-१७ ते २०२०-२१ वीस पर्यंत सर्व योजनांची घरकुले अभियान कालावधीमध्ये १०० टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांना वारंवार प्रत्यक्ष भेटी देण्यात आलेल्या असून, त्याकरिता लागणारा प्रवास भत्ता देखील अद्याप या अभियंत्यांना मिळाला नाही. पेट्रोल डिझेलचे दरवाढ झाल्यामुळे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मागील माहे जून २०२० ते माहे मार्च २०२१ पर्यंतचे एकूण १० महिन्याचे मानधन यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या परिवारावर उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे. नव्हे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. तरी पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये मानधन देण्यात यावे, अन्यथा १९ जुलैपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. जुलै रोजी गटविकास अधिकारी अर्जुनी-मोर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना निवेदन देण्यात आले आहे. - बी.पी. नेवारे, एच. वाय. बोरकर, धर्मराज मेश्राम, घनश्याम नाकाडे, पुरुषोत्तम मेश्राम, हंसकुमार पारधी, तेजप्रकाश इटवले, संदिप चूटे, रजत नारनवरे ,नितेश चिंधालोरे. हे दहा ग्रामीण अभियंते बांधकाम विभाग(घरकुल), पंचायत समिती अर्जुनीमोरगाव येथे कार्यरत आहेत. 

 ग्रामीण अभियंत्यांना सुनिश्चित असे मानधन नाही प्रती घरकुल एक हजार रुपये मिळतात. प्रवास भत्ता देखील दिला जात नाही. तेही गेल्या दहा महिन्यापासून दिले गेले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली असून, लवकरात लवकर आमचे मानधन मिळावे. जोपर्यंत आमचे मानधन मिळणार नाही तोपर्यंत हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहणार. - धर्मराज मेश्राम, ग्रामीण अभियंता अर्जुनी मोरगाव.